बँक बुडवणार्‍यांचा हिशेब चुकता करा

0

नंदुरबार । ज्यांनी पी. के. अण्णा पाटील सहकारी बँक डबघाईला नेली, लोकांचे पैसे दिले नाहीत, ते आज निवडणूक लढवित आहे. या जुन्या आठवणींचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली असल्याचे सांगत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर तोफ डागली.नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 3 मधील काँग्रेस शिवसेना युतीच्या उमेदवार शोभाताई मोरे, भावना गुरव यांच्या प्रचारासाठी करण चौफुलीवर बुधवारी रात्री जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

विकासाच्या मुद्यावरूनच प्रचार
या सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आरोप केले. ते म्हणाले की, नंदुरबार शहराचा विकास केवळ आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखालीच योग्य पद्धतीने होऊ शकतो. या विकासाला साथ देण्यासाठी शिवसेना व काँग्रेसने युती केली आहे. ज्या लोकांमुळे पी.के. अण्णा पाटील जनता बँक डबघाईला गेली आहे तेच लोक आता निवडणूक लढवित असल्याचे आश्‍चर्य आहे. पंण नंदुरबारची जनता सुज्ञ असल्याने त्याची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. असे ते म्हणाले. या सभेला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शहरात आधी विकास करून दाखविला, त्या विकासाच्या मुद्दयावरच मी मत मागत आहे. जनतेने जर चुकून विरोधकांच्या हातात सत्ता दिली तर नगरपालिकेच्या टॉवरवर मुंबई-कल्याणचे आकडे दिसतील. यावेळी व्यासपीठावर मोहन माळी, उमेरवार राकेश हासाणी, गजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते.