मोबाईलवर फोन करून विचारली एटीएम कार्डाची माहिती : सतर्कतेचे आवाहन
भुसावळ- स्टेट बँकेतून मॅनेजर बोलत असल्याचे सांगून सेवानिवृत्त शिक्षकाकडून एटीएम कार्ड व बँक खात्याची माहिती काढून भामट्यांनी 70 हजारात गंडा घातल्याची घटना 18 रोजी घडली. प्रकरणी तुकाराम दामू अटाळे (61, देना नगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 18 रोजी अटाळे यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल आल्यानंतर पलिकडच्या व्यक्तीने आपण भुसावळ स्टेट बँकेचे मॅनेजर बोलत असल्याचे भासवून खाते बंद करावयाचे नसल्यास एटीएम कार्डावरील क्रमांक सांगा, असे सांगितल्याने अटाळे यांनी एटीएम कार्डाच्या पासवर्डसह बँक खात्याची सविस्तर माहिती दिली. भामट्याने मोबाईल बंद केल्यानंतर काही वेळानंतर मोबीक्विक व ओला कॅब.कॉम या वेबसाईटचे दोन संदेश त्यांना प्राप्त झाले व खात्यातील 69 हजार 696 रुपयांची रक्कम कापली गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेत धाव घेतली. बँक अशा पद्धत्तीने कोणताही पासवर्ड व खात्याची माहिती विचारत नाही, असे उत्तर बँकेकडून मिळाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी बाजारपेठ पोलिसात धाव घेतली. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे करीत आहेत. दरम्यान, हा गुन्हा तपासासाठी सायबर सेलकडे पाठवण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.