चाळीसगाव- उंबरखेड बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक अभिजीत काळकर हे दुचाकीने रोखपाल स्वप्नील देवकर यांच्यासह बँकेत जाण्यासाठी निघाल्यानंतर त्यांच्यावर चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला करीत बॅग लांबवल्याची घटना गुरुवारी सकाळी 10.30 वाजता आडगावजवळील म्हसोबा मंदिराजवळ घडली होती. या प्रकरणी तीन अट्टल आरोपींना अटक करण्यात मेहुणबारे पोलिसांना यश आले असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी पसार असून लवकरच तेही गजाआड होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
लुटीच्या उद्देशाने केला हल्ला
काळकर व देवकर हे बँकेत जात असताना उभयंतांकडे रोकड असल्याच्या समजातून त्यांच्यावर चॉपरने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुरनं.130/18 भादवि कलम 395, 397, 341 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर समाधान रामदास म्हस्के, वसंत राजु बच्छाव (दोन्ही रा.चाळीसगाव) व साहेबराव उर्फ सायबु विक्रम कोळी (रा.उबंरखेड) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असाता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत वापरलेल्या दोन चाकुंपैकी एक काढुन दिला आहे. अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनला खुन, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.