बँकेक्स तब्बल 600 अंकांनी घसरला
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याने बँकिंग क्षेत्राचे धाबे दणाणले आहे. या घोटाळ्यामुळे बँकांच्या शेअर्सची मोठ्याप्रमाणात घसरण झाली आहे. पीएनबी घोटाळा 11,400 कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज सध्या व्यक्त होत असला तरी या घोटाळ्यानंतर शेअर बाजारात बँकांच्या शेअर्सच्या विक्रीचा जो तडाखा बसला त्यात 67,800 कोटी रुपयांची होळी झाली आहे. हा घोटाळा उघड झाल्यापासून मुंबई शेअर बाजारातील बँकेक्स निर्देशांक 28732 वरून घसरून सोमवारी तीनच्या सुमारास 28113 पर्यंत आला होता. तब्बल 615 अंकांच्या या घसरणीने भारतीय बँकांचे भांडवली मूल्य सुमारे 70 हजार कोटींनी खाली आले आहे.
अनेक बँकांना फटका
अशा घोटाळ्यांमध्ये सुरक्षेची तरतूद म्हणून जास्त रक्कम बाजुला ठेवली जाईल परिणामी बँकांचा नफा घसरेल आणि त्यामुळे शेअर्सचे मुल्यही कमी होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. केवळ 11,800 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा प्रश्न नसून एकंदर यंत्रणाच कशी बेभरवशी आहे हा चिंतेचा विषय आहे. सरकारी बँकांची यंत्रणा अकार्यक्षम असून सीबीएस किंवा कोअर बँकिंगसारखी यंत्रणा बाजुला सारून काम केले जाते हे धक्कादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पीएनबी घोटाळ्यामुळे स्टेट बँक, अॅक्सिस, यस, आयसीआयसीआय या बँकांच्या शेअर्सची घसरण झाली आहे.
बँकेच्या मुंबईतील शाखेला सील
पीएनबी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची कारवाई वेग घेत आहे. या घोटाळ्याचं केंद्र मानलं गेलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या फोर्ट येथील ब्रॅडी हाऊस शाखेला सीबीआयने टाळं ठोकलं आहे. नीरव मोदीच्या चौकशीचीदेखील तयारी सीबीआयने केली आहे. दक्षिण मुंबईतल्या काळा घोडा येथील ब्रॅडी हाऊस इमारतीत पीएनबीची शाखा आहे. बँकेच्या बाहेर सीबीआयने नोटीस लावली आहे. नीरव मोदी घोटाळाप्रकरणी ही शाखा सील करण्यात येत आहे, असे या नोटीशीत लिहिलं आहे. आता या शाखेत कोणतंही काम होणार नाही. पीएनबीच्या कर्मचार्यांनादेखील येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
औरंगाबाद कनेक्शन?
पंजाब नॅशनल बँकेच्या 11400 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे. या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयच्या (ईडी) पथकाने शहरातील प्रोझोन मॉलमधील शॉपर्स स्टॉपवर छापा टाकला आहे. सोमवारी सकाळीपासून दिल्लीहून आलेले ईडीचे आठ जणांचे पथक चौकशी करत आहे.