वाघोली ग्रामपंचायतीच्या पथकाने दिली भेट
वाघोली : वाघोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये भेडसावणारा कचजयाचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पाऊले उचलण्यात येत असून यासाठी बँगलोर येथील कचरा प्रक्रीया व मुंबई येथील सांडपाणी प्रकल्पाची पाहणी ग्रामपंचायतीच्या पथकाकडून करण्यात आली. सोमवारी (दि.26), माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे,माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी उपसरपंच समीर भाडळे,वाघोलीचे उपसरपंच रामकृष्ण सातव पाटील , जयप्रकाश सातव, ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे,संदिप सातव, यांच्या पथकाने बंगलोर येथील कचरा प्रकल्पाची भेट घेऊन माहीती घेतली.
हैद्राबाद प्रकल्पाला भेट देणार
यावेळी बंगलोर येथील कचरा विघटन प्रकल्प चांगला असून या प्रकल्पाद्वारे कोणत्याही कचर्याची विल्हेवाट कमी जागेत व कमी वेळात पर्यावरणापूरक पद्धतीने होत असल्याने ह्या सारखे प्रकल्प ज्या ठिकाणी यशस्वी रीतीने राबवला गेला आहे त्या हैद्राबाद येथिल प्रकल्पाची भेट घेऊन माहीती घेणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले.
दिवसेंदिवस कचर्याचा सांडपाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. शहराच्या आसपास उपनगरात लोकवस्ती वाढत आहे. या पार्श्वभुमीवर वाघोलीची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन कचरा आणि सांडपाणी याबाबतीत आदर्श प्रकल्पांची पाहणी करून वाघोली कचरा व सांडपाणी मुक्त करणार आहे.
-वसुंधरा उबाळे, सरपंच वाघोली