बंगळुरू । बंगळुरूच्या वार्थुर तळ्यातून विषारी फेस बाहेर पडत होता. याचे प्रमाण एवढे होते की, हा फेस रस्त्यावर येत होता. सोमवारी सकाळपासून या विषारी फेसमुळे रस्त्यावरच्या वाहतुकीचाही वेग मंदावला होता. या फेसासारख्या पुंजक्यामुळे आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो का याचा देखील अभ्यास होणे गरजेचे असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटले. या तळ्यातले पाणी नेमके कुठून येते किंवा यात कोणते केमिकल्स सोडले जाते आहे. याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.
शहरात वाढलेल्या तापमानात मान्सूनपुर्व पावसामुळे घट झाल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला. मात्र, या पावसाने एकीकडे दिलासा दिला असताना तलावाशेजारी राहणा-यांच्या समस्या मात्र वाढवल्या आहेत. शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बर्फवृष्टी होऊ लागली आहे. मात्र ही बर्फवृष्टी केमिकल आहे. पावसामुळे तलावात फेस झाला असून संपूर्ण रस्त्यावर तो पसरला. जवळच राहणार्यांना तर आपण ढगात असल्यासारखं वाटत असावे इतका फेस या तलावातून निघाला. रस्त्यावरुन जाणार्या गाड्यांनाही या फेसामुळे त्रास होत असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तलाव फेसाळल्यामुळे शहरातील रस्त्यांवर जणू बर्फवृष्टीच होत असल्यागत चित्र पाहायला मिळाले.