बंगालने महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आणले

0

नवी दिल्ली । विजय हजारे चषक क्रिकेटमधील महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले आहे.फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बंगालने महाराष्ट्राची विजयी घोडदौड एक चेंडू व चार विकेटस राखून संपुष्टात आणली. बंगालने या विजयासह या चषकांच्या उपांत्य फेरी गाठली.महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठी व निखिल नाईक यांच्या झंझावाती भागीदारीच्या जोरावर 50 षटकांत 6 बाद 318 धावा करीत बंगालला आव्हान दिले. तथापि श्रीवत्स गोस्वामी, सुदीप चटर्जी व अनुस्तुप मजुमदार यांनी केलेल्या शानदार अर्धशतकांमुळेच बंगालने 50व्या षटकातील पाचव्या चेंडूवर विजयश्री खेचून आणली.

महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड (43) व कर्णधार केदार जाधव (44) यांनी दमदार खेळ करूनही एक वेळ त्यांची 4 बाद 148 अशी स्थिती होती. त्रिपाठी व नाईक यांनी आक्रमक फटकेबाजी करीत पाचव्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी रचली. त्रिपाठी याने 74 चेंडूंमध्ये 95 धावा करताना नऊ चौकार व चार षटकार अशी टोलेबाजी केली. सयान घोष याने त्याला शतकापूर्वी बाद केले. नाईकने दोन चौकार व पाच षटकारांसह 63 धावा केल्या. श्रीकांत मुंडे व शमसुझामा काझी यांनी प्रत्येकी नाबाद 20 धावा करीत संघास तीनशे धावांपलीकडे नेले.बंगालने अभिमन्यू ईश्वरनची विकेट झटपट गमावली, मात्र त्यानंतर गोस्वामीने पी.अग्निवच्या साथीने 81 धावांची भर घातली. गोस्वामीने सात चौकारांसह 74 धावा केल्या तर अग्निवने सहा चौकार व एक षटकारासह 47 धावा केल्या. कर्णधार मनोज तिवारीने शैलीदार 40 धावा करूनही बंगालचा डाव 4 बाद 187 धावांपर्यंत घसरला होता. परंतु चटर्जी व मजुमदार यांनी 117 धावांची भागीदारी करीत संघाचा विजय दृष्टिपथात आणला. मजुमदारने सात चौकार व एक षटकारासह 66 धावा केल्या. चटर्जीने चार चौकार व दोन षटकारांसह नाबाद 60 धावा केल्या. शेवटच्या षटकांतील तिसर्‍या चेंडूवर काझी याने कनिष्क सेठ याचा त्रिफळा उडवला. मात्र सेठच्या जागी आलेल्या अमीर गनीने पाचव्या चेंडूवर चौकार चढवीत संघाच्या विजयावर मोहर उमटवली.