तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही दुर्लक्ष
अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे तक्रारदाराने मांडली व्यथा
शिरपूर:जिल्ह्यात एका जात पंचायतीने आपल्याच जातीच्या पाच कुटुंबाना बहिष्कृत केले असल्याचे धुळे जिल्ह्यात जात पंचायतने डोकेवर काढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांना लेखी देऊनही दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.धुळे तालुक्यातील खोरदड तांडा येथील बंजारा समाज जातपंचायतीने बंजारा समाजातील पाच कुटुंबाना समाजातून बहिष्कृत केले असल्याने तक्रारदारांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देऊन दाद मागितली होती. परंतु तालुका पोलिसांनी याप्रकरणी दुर्लक्ष केल्याने तक्रारदाराने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यालय गाठुन आपबिती कथन केली.
सविस्तर असे, तक्रारदार दीपक सोमा राठोड (रा.खोरदड) हे बंजारा समाजातील आहे. त्यांच्या कुटुंबासह गावातील पाच कुटुंबांना जात पंचायतने जात बाहेर काढून त्यांच्या कुटुंबियांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरू न देणे, गावात किराणा, औषधे, खरेदी करू न देणे, पिठाच्या गिरणीवर येऊ न देणे, समाजातील लग्न, धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधीला हजर न राहु देणे, मुला-मुलींचे लग्न जमु न देणे, पिडीत कुटुंबाला खोरदड तांड्यातील त्यांच्या घरांमध्ये राहुन देता या पाचही कुटुंबांना खोरदड शिवारातील शेतामध्ये आपल्या पत्नी, मुलाबाळासह रहावे लागत आहे. अशा प्रकारचा जाच जात पंचायतीच्या पंचांनी दिला असल्याची व्यथा तक्रारदाराने अंनिसकडे मांडुन मदतीची अपेक्षा केली आहे.
त्यामुळे अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जातपंचायतीला मुठमाती अभियान प्रमुख क्रुष्णा चांदगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.सुरेश बिर्हाडे, जिल्हा सचिव प्रा.डॉ.दीपक बाविस्कर, कायदेशीर सल्लागार अॅड.विनोद बोरसे यांनी नुकतेच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन खोरदड येथील बंजारा जातपंचायतीचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण अधिनियम 2016चे कलम 10 नुसार पिडीत व्यक्तीने दिलेली तक्रार दखलपात्र आहे. त्यामुळे धुळे तालुका पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त होते. मात्र, तालुका पोलीस ठाण्याने दखल न घेतल्याने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाद मागितली आहे.
-अॅड.विनोद बोरसे, कायदेशीर सल्लागार, अंनिस, धुळे