बंडखोर आमदारांना भेटायला गेलेल्या दिग्विजय सिंहांना अटक

0

बंगळूर: कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया भाजपवासी झाल्याने मध्य प्रदेशातील राजकारणाला नवीन कलाटणी मिळाली आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. तब्बल २२ आमदारांनी सामुहिक राजीनामे दिल्याने कमलनाथ सरकार मोठ्या संकटात आहे. दरम्यान कोरोनामुळे २६ मार्चपर्यंत विधानसभेचे अधिवेशन स्थगित करण्यात आल्याने सरकारवरील संकट टळले होते. मात्र याबाबत भाजपने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन तातडीने बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली. आज बुधवारी बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूत असलेल्या या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह तिथे पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

मध्य प्रदेशातील २१ बंडखोर काँग्रेस आमदार सध्या रामदा हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना भेटण्यासाठी दिग्विजय सिंह या हॉटेलवर पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये जाऊन आमदारांशी चर्चा करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे दिग्विजय सिंह यांनी हॉटेलबाहेरच ठिय्या मांडला. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशातील आमचे सरकार कायम राहणार असून आमचे आमदार परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.