भारत सरकारने गेल्या काही वर्षात भारतीय बंदरांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि आधुनिकीकरणासाठी विविध पावले उचलली आहेत. सागरी आणि आंतर्देशीय जलवाहतूक ही इंधनक्षम, पर्यावरण स्नेही आणि कमी खर्चीक असल्याने अवजड मालाच्या वाहतुकीसाठी जलमार्ग हा दळणवळणाचा उत्तम पर्याय असल्याचे लक्षात आल्याने ही पावले टाकण्यात आली आहेत. 2019 पर्यंत वस्तू आणि वाहतूक यांचे प्रमाण जलमार्गाने सध्याच्या 3.5% वरून 15% इतके पाचपट वाढवण्यासाठी सरकार या धोरणावर कार्य करत आहे. तुलना केल्यास रस्ते वाहतुकीच्या प्रती किमी रु. 1.50 आणि रेल्वेच्या प्रती कि.मी. रु.1 या दराचा विचार करता जलवाहतुकीचा खर्च प्रती किमी रु. 0.25 ते 0.30 पैसे आहे. भारत सरकारने 6 नवीन मोठी बंदरे महत्त्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पांतर्गत मंजूर केली आहेत, 6 मोठी बंदरे बांधण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि भाजपप्रणीत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वाच्या आणि इतर बंदरांमध्ये सागरी आर्थिक क्षेत्रे (सीईझेड) निर्माण करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
बंदरावरील थेट रोजगार: बंदर बांधणीच्या सुरुवातीच्या 10 वर्षांच्या काळात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कामांसाठी विविध कौशल्य असलेले मनुष्यबळ बंदरावर लागेल. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकासविषयक परिषदेनुसार (यूएनसीटीएडी) बंदरावर निर्माण होणार्या प्रत्येक रोजगारामागे बंदरांच्या बाहेर 5-6 रोजगार निर्माण होतात. स्थानिक गुणवत्तेचा शोध घेताना कंपनीसमोर नेहमी उपलब्ध गुणवत्तेतून कौशल्याची गरज भरून काढण्याचे आव्हान असते. स्थानिकांना फायदा होत नसेल तर कोणताही प्रकल्प चांगला म्हटला जाऊ शकत नाही. प्रकल्प सुरू होण्याआधी स्थानिक गुणवत्तेचा शोध घेऊन त्यांच्या कौशल्याला अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण देऊन रोजगार आस्थापनेत जास्तीत जास्त स्थानिक गुणवत्तेला संधी मिळेल याची दक्षता घेता येईल. प्रकल्पाच्या प्राथमिक काळात बंदरावर वास्तुविशारद/स्थापत्य, लॉजिस्टिक्स आणि प्रशासन आणि सहाय्यक यांची गरज लागू शकते. वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील मनुष्यबळ हे बंदरांच्या बांधकामात लागेल. नियोजन आणि स्त्रोतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी लॉजिस्टिक्स क्षेत्रातील गुणवत्तेची गरज लागेल जेणेकरून खर्चावर नियंत्रण ठेवता येऊ शकेल. याबरोबरच प्रशासकीय आणि सहाय्यक कर्मचार्यांची गरज दैनंदिन कामांसाठी लागेल. जसे बांधकामाची प्रगती होऊन ते अंतिम टप्प्यात पोहोचेल तेव्हा बंदराला सर्व शाखातील, वित्त आणि लेखा, नियोजन, तांत्रिक (यांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक/विद्युत/मरिन/लॉजिस्टिक्स), नियोजन आणि नियंत्रण इ. शाखातील स्त्रोतांची गरज लागेल.
अप्रत्यक्ष संधी: एक बंदर लघुकालीन पण आवश्यक गरजेच्या कामांची निर्मिती करते. असेच एक काम म्हणजे बंदराच्या निर्मितीच्या काळात कच्चा माल आणण्यासाठी किंवा टाकण्यासाठी ट्रक, डम्पर्स/क्रेन्सची लागणारी गरज तसेच कर्मचार्यांच्या बंदरापर्यंत वाहतुकीसाठी बसची गरज लागते. या दोन्ही व्यतिरिक्त वरिष्ठ व्यक्ती, अतिथी, पर्यटकांसाठी खासगी वाहनांची गरज लागते. पुढील गरज म्हणजे बंदर क्षेत्राच्या आसपास हिरवळीची देखभाल करणे. त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर बागकाम करणार्यांची नियुक्ती केली जाईल. पाण्याखालील कामांसाठी किंवा समुद्रातील कामांसाठी पाणबुडे आणि टग व बार्जची गरज लागेल. पाण्याखालील सर्वेक्षण, बांधकाम किंवा हूल/बंदर दुरुस्ती यासाठी पाणबुड्यांची गरज असेल. टग आणि बार्ज ही बंदरांची कायमस्वरूपी गरज असेल. बांधकामादरम्यान पाण्यात कच्च्या मालाचा पुरवठा करणे आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर टगच्या बर्थचा वापर मोठी जहाजे पार्क करण्यासाठी किंवा तैनात करण्यासाठी होऊ शकतो. याव्यतिरिक्त खास कामांकरिता प्रकल्प अभियंत्यांची गरज अधूनमधून लागेल. साधारणपणे देशातील बंदरांची सुरक्षा केंद्रीय सुरक्षा दलाद्वारे बघितली जाते, पण अर्ध वर्तुळाची सुरक्षा बघण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांची गरज लागते. प्रत्येक कार्यालयात हाऊस कीपिंगसाठी कर्मचारी लागतात जिथे स्थानिक गुणवत्तेचा वापर करता येऊ शकतो.
उद्योजकतेच्या संधी : प्रत्येक बंदराला एका अनुकूल समर्थ प्रणालीची प्रचंड आवश्यकता असते. प्रकल्पाची वृद्धी आणि विकास यांच्या परस्परातील देवाणघेवाणीत त्या भागाची आणि रहिवाशांची प्रगती होत असते. उद्योजकांना आपला व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी एक मोठी संधी प्राप्त होत असते. त्याचे कारण बंदरातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार वाढीतून निर्माण झालेला निधीचा प्रवाह. कारण खाली झिरपण्याच्या नियमानुसार बंदरामुळे झालेला विकास सर्व स्तरावर पोहोचतो. मिळकतीचे चक्र जसे वधारते तसे स्थानिक रहिवाशांचे दरडोई उत्पन्नदेखील वाढते. याचा एकत्रित परिणाम मागणी आणि पुरवठा यांच्यावर होतो.
या सगळ्यात एक आर्थिक चक्र पूर्ण होते. वर जरी उद्योजकतेच्या बाबतच्या संधींची यादी दिलेली असली, तरी खोलवर निरीक्षण केल्यास स्वयं उद्योजक होण्याच्या संधी मोठ्याप्रमाणावर स्थानिकांना उपलब्ध होणार आहेत. कोणत्याही मोठ्या प्रकल्पामुळे चांगले रस्ते, वीज, पूरक सोयी अशा पायाभूत सुविधा मिळाल्याने व्यवसाय वृद्धीसाठी संधी प्राप्त होते. जे परावलंबी आहेत पण त्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांच्याकडे बंदर निर्मितीमुळे स्वावलंबी होण्यासाठी एक संधी प्राप्त होते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बाहेरून येणार्या कर्मचार्यांची निवासाची सोय बंदर क्षेत्रात होणे गरजेचे आहे. बंदर क्षेत्राबाहेरील व्यक्तींच्या गरजा निर्माण झाल्यास सूतार, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, यंत्र कामगार, प्लम्बर, निवासी साहाय्यता कर्मचारी, भाज्या/फळ विक्रेते यांची गरज निर्माण होऊन स्थानिक अर्थव्यवस्था वाढीस लागू शकेल.
सुशीलकुमार – 9619582835