खेड शिवापूर । पुणे-सातारा महामार्गावर सांडपाणी येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून जाण्यासाठी बंदिस्त गटारे बांधण्याची मागणी खेड शिवापूर परिसरातील ग्रामस्थांसह हॉटेल व्यवसायिक करीत आहेत.
पुणे-सातारा रस्ता रुंदीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. खेड शिवापूर परिसरात सेवा रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. परंतु सेवा रस्त्यालगत लहान-मोठे हॉटेल व्यवसायिक, तसेच रहिवासी असून या परिसरात पावसाचे पाणी अथवा सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारांची व्यवस्था केलेली नसल्याने ते पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असल्याने ग्रामस्थांच्या आणि प्रवाशांच्या, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सेवा रस्त्याचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करून याठिकाणी महामार्गालगतच्या सेवा रस्त्याजवळ पावसाचे, तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठी बंदिस्त गटारे करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थ आणि हॉटेल व्यवसायिकांकडून केली जात आहे.