सभापती अॅड.शुचिता हाडा, दारकुंडे यांचा पाठपुरावा
जळगाव :शहरातील बंदिस्त गटारींच्या साफसफाईकरीता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे सध्या कुठलीही यंत्रणा नसल्याने नगरसेवकांकडून तक्रारी करण्यात येत होते. त्यामुळे आरोग्य विभागाने नवीन दोन रॉडिंगमशिनची खरेदी केली आहे. या मशिनमुळे बंदीस गटारीमध्ये अडकलेला कचरा काढण्यास मदत होणार आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे सध्यास्थितीत बंदीस्त गटारीमधील साफसफाईसाठी सध्या कोणतीही यंत्रणा नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी गटारींमध्ये कचरा अडकुन गटारींचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून नगरसेवकांकडे येत असतात. नगरसेवकांनी यासंदर्भात महासभेत आवाज उठविला होता. त्यानंतर सभापती शुचिता हाडा, नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी पाठपुरावा सुरु ठेवला असून मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी याची दखल घेत दोन रॉडींग मशिन खरेदीचा प्रस्ताव तयार केले. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नुकतेच सुमारे 2 लाख 85 हजार रुपयांचे दोन रॉडींग मशिन खरेदी करण्यात आले. येत्या दोन दिवसात हे मशिन महापालिकेत दाखल होणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
बंदिस्त गटारींच्या सफाईची अडचण होणार दूर
शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांनी गटारींवर ढापे टाकले आहेत. तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या क्रासिंग असल्याने गटारींसाठी पाईप टाकण्यात आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कामगारांकडून साफसफाई करतांना अनेक अडचणी निर्माण होतात. बंदिस्त गटारीमधील साफसफाई करतांना कर्मचार्यांना इजा होणे, विंचू चावणे, सर्प दंश होणे असेही प्रकार घडतात. मात्र, मनपाने आता नवीन दोन यंत्र खरेदी केल्यामुळे बंदिस्त गटारींची साफसफाई सोईस्कर होणार आहे.