बंदीवान कैद्यांचे कारागृहात आमरण उपोषण

0

जळगाव : भिमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद काळात भुसावळ येथे दगडफेकीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी अटकेत असलेल्या 18 संशयितांनी गुन्ह्यातील कलम 307 मागे घेण्यात यावा तसेच मुख्य सूत्रधार संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांना अटक करावी यासाठी जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या 18 कैद्यांनी दि.5 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.भिमा कोेरेगाव येथे दि.1 जानेवारी रोजी मानवंदना देण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ दि.3 रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. भुसावळ येथे देखील बंद सुरू असताना काही तरूणांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात येवून 18 जणांना अटक करण्यात आली होती. संशयितांवर दंगलीसह कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तीन दिवसांपूर्वी दिले निवेदन
जिल्हा कारागृहात असलेले बंदी रविंद्र पगारे, सदानंद खंडेराव, भावेश भालेराव, नितीन महेंद्र खरे, भगवान गायकवाड, श्रावण देवरे, अमोल बनसोडे, तुषार वाघ, चेतन आव्हाड, नितीन वाघ, विशाल कोचूरे, भिमा इंगळे, आशिष सोनवणे, किशोर लोखंडे, आकाश सपकाळे, आकाश वानखेडे, विशाल सपकाळे, संगित खंडेराव यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे कारागृह अधिक्षकांना निवेदन दिले होते. भिमा कोरेगाव दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या सर्व निरपराधांवर दाखल केलेला कलम 307 मागे घेण्यात यावा तसेच दंगलीचे मुख्य सूत्रधार संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांना अटक करण्यात यावी अन्यथा दि.5 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी निवेदनाव्दारे दिला होता.

उपोषणाचा दुसरा दिवस
काही दिवसांपूर्वी अटकेतील संशयितांचा दुसर्यांदा जामीन अर्ज न्यायालयाने रद्द केला. त्यानंतर निवेदनात दिलेल्या इशार्यानुसार सर्व 18 संशयित बंदीवान कैद्यांनी दि.5 फेब्रुवारीपासून कारागृहात आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. दि.5 पासून सुरू झालेल्या उपोषणाचा दुसरा दिवस संपत आला असून त्यांनी पाण्याचा एकही थेंब तोंडाला लावला नसल्याची माहिती समजते. तसेच बंद्यांनी दिलेल्या निवेदनाबाबत न्यायालयाला तात्काळ कळविण्यात आले आहे. तसेच सुरू असलेल्या उपोषणाबाबत वरीष्ठांना आणि न्यायालयाला कळविण्यात आले असल्याची माहिती कारागृह अधीक्षक विलास साबळे यांनी दिली आहे.