बंदीही हटली, गणपतीही गेले, दारुदुकाने सुरु झाली!

0

पुण्यात 270 मद्यविक्री दुकाने पुन्हा सुरु

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने महापालिका हद्दीतील मद्यविक्री दुकानांवरील बंदी हटविल्यानंतर पुणे शहरातील 270 दुकाने कालपासून पुन्हा सुरु झाली आहेत. महामार्गावरील दारूविक्री दुकाने बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर एप्रिलमध्ये महामार्गापासून 500 मीटरच्याआत असलेली सर्व मद्यविक्री दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केली होती. तथापि, पुनर्सुनावणीदरम्यान न्यायालयाने महापालिका हद्दीतील बंदी हटविण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे मद्यशौकिनांसह दारूविक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला होता. गेले काही दिवस शहरात असलेली गणेशोत्सवाची धामधुम संपताच शुक्रवारपासून मद्यविक्रेत्यांनी आपली दुकाने पुन्हा उघडली आहेत. या दुकानांचे परवाना नूतनीकरणासाठीचे अर्ज राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे प्रलंबित आहेत. लवकरच परवान्यांचे नूतनीकरण करून दिले जाईल, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने देण्यात आली.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील 380 दुकानांना बसला होता फटका
बुधवारपासून उत्पादन शुल्कविभागाच्यावतीने सीलबंद केलेल्या दुकानांचे सील काढण्याची कारवाई सुरु केली होती. त्यानुसार दोन दिवसांत शहरातील 270 दारूदुकाने पुन्हा सुरु झाली आहेत. त्यात प्रामुख्याने जेएम रोड, अहमदनगर रोड, सिंहगड रोड, सातारा रोड, कर्वे रोड, पौड रोड आणि विद्यापीठ रोड या मार्गावरील दुकानांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एप्रिलमध्ये या दुकानांना सील लावण्यात आले होते. न्यायालयाच्या या आदेशानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 380 दुकानांना सील ठोकण्यात आले असून, हे सील काढण्याची मोहीम उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी हाती घेतली आहे. जूनमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महापालिका हद्दीतून जाणार्‍या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील रेस्टॉरंट, परमीट रुम, बार, हॉटेल्स यांच्यावर मद्यविक्री करण्यास घातलेली बंदी हटविण्याचा निर्णय दिला होता. न्यायालयाच्या या निर्णयाचे हॉटेल आणि रेस्टॉरंट फेडरेशनच्यावतीने स्वागत करण्यात आलेले आहे.

काळ्या बाजारातील मद्यविक्रीला चाप!
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मद्यविक्री बंद झाल्याने काळ्या बाजारात मद्यविक्रीला उधाण आले होते. तसेच, बीअर व इतर मद्याची अव्वाच्यासव्वा दराने विक्री केली जात होती. त्यामुळे महापालिका हद्दीतील मद्यविक्री दुकाने पुन्हा सुरु झाल्याने काळ्या बाजाराला चाप लागणार आहे. त्यामुळे या निर्णयाबद्दल पुण्यातील मद्यशौकिनांनी आनंद व्यक्त केला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार, ग्रामीण भागातील ग्रामसभांनी ठराव घेतला तर त्या दारू दुकानाला सील ठोकण्याची कारवाई मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.