भुसावळ । राज्यात सुगंधित तंबाखू, गुटखा विक्रीवर शासनाने बंदी लादली आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेश, गुजरात यासारख्या परप्रांतातून सुगंधित तंबाखू, गुटख्याची आवक शहरात होत असून अवैधरित्या विक्री होत असलेल्या गुटखा तंबाखुमध्ये शहरात लाखो रुपयांच्यावर उलाढाल होत आहे. त्यामुळे गुटखाबंदी नावापुरताच उरली असल्याचे चित्र आहे. या प्रकाराकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून सर्रासपणे विकल्या जाणार्या गुटख्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने चढ्या भावाने विक्री
तंबाखू, गुटखा या सारख्या हानीकारक वस्तुंवर राज्य शासनाच्या वतीने बंदी लादण्यात आली आहे. परंतु शहरातील विविध पान टपर्या, किराणा दुकानदार यांच्याकडून या गुटखा बंदीचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. मागणी जादा आणि आवक कमी असल्याने या वस्तुचे दरही गगनाला भिडले आहेत. तरीही युवा पिढी चढ्या दराने मरणाच्या मार्गावर नेणार्या या हानीकारक वस्तुंची खरेदी करुन आपली तलफ पूर्ण करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या पदार्थावरील बंदीही कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे.
युवा पिढी व्यसनांनी ग्रासली
परिणामी आजची भावी युवा पिढी या व्यसनामुळे उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. आजची युवा पिढी देशाचे उद्याचे उज्वल भविष्य समजले जाते. पंरतु आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या एकविसाव्या शतकात युवा पिढीला विविध व्यसनांनी ग्रासले आहे. शहरात गुटखा, तंबाखुसह इतर हानीकारक वस्तुंवर लाखो रुपयांची उलाढाल होत असून गुटखाबंदी नावापुरतीच उरलेली आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देवून अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
दुकानांची झडती घ्यावी
युवापिढी शरीरासाठी हानिकारक असलेल्या वस्तुंचे सेवन करीत आहेत. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही. व्यसनाचा हा विळखा युवा पिढी व्यसनाच्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे युवकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. गुटख्याच्या सेवनाने कँसर सारखे रोग तरुणांना जडत असून या रोगांमुळे त्यांचे आयुष्य पुरते उध्वस्त होत असते. त्यासाठी शासनाने गुटखा विक्रेत्यांवर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शहरात सुरु असलेल्या पान टपर्या तसेच दुकानांची झडती घेऊन कारवाईची आवश्यकता आहे.