बंदुकीचा धाक दाखवून इंदुरच्या व्यापार्‍यांचे दहा लाख लुटले!

0

धुळे । तालुक्यातील देवभाने शिवारात बंदुकीचा धाक दाखवत तीन दरोडेखोरांनी इंदौर येथील व्यापार्यांची 10 लाखांची रोकड लुटून नेली. यावेळी व्यापारी व दरोडेखोर यांच्या झटापटी झाल्याने एक व्यापारी जखमी झाला आहे. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मध्यप्रदेश राज्यातील इंदौर येथील सराफ राजेश निमा यांचेकडून अरुण सत्यनारायण राठोड, पुतीन गुप्ता व लोकेश नहार या तिघा लहान व्यापार्यांनी दि. 15 रोजी रात्री सुमारे दोन किलो सोने घेतले. तिघे व्यापारी खाजगी लक्झरी बसने नाशिकला गेले होते.

दरोडेखोरांसोबत झटापट
याचवेळी तिघा दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवून व्यापार्यांकडून दहा लाखांची रोकड लुटली. यावेळी अरुण राठोड याने दरोडेखोरांसोबत झटापट करण्याचा प्रयत्न केला असता एका दरोडेखोराने राठोड यांच्या मानेवर कोयता लावला. त्यानंतर देवभाने गावाजवळूनच तवेरा चालकाने यु-टर्न घेतला. यावेळी गाडीत व्यापारी व दरोडेखोर यांच्या झटापट सुरुच होती. यामुळे चालकाचा तोल जाऊन तवेरा गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. त्याचा फायदा घेत पुतीन व लोकेशने गाडीचा दरवाजा उघडून उड्या मारल्या.

चालत्या वाहनातून उडी
थोडे अंतरावर राठोडने देखील चालत्या वाहनातून उडी मारली. त्यात त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी तिघा दरोडेखोरांनी 10 लाख रुपये रोख, चार मोबाईल, तीन बॅग व कपडे असा एकून 10 लाख 51 हजार 900 रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी अरुण राठोड यांनी सोनगीर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून तिघा अज्ञातांविरूध्द भादंवि कलम 394, 34 सह आर्मअ‍ॅक्ट कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारे करीत आहेत.

डोळ्यात मिरची पावडर फेकली
अशोक स्तंभाजवळील अशोक भाई यांना तिघांनी त्यांच्या जवळचे दोन किलो सोने विक्री करुन त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेऊन ते घराकडे निघाले. ते तिघे द्वारका सर्कलला उभे असतांनाच त्यांच्याजवळ एक तवेरा गाडी (एमएच 46, डब्ल्यू 5876) येऊन थांबली. चालकाने इंदूरला जात असल्याचे सांगितल्याने तीनही व्यापारी त्या गाडीत बसले. यावेळी चालकाशेजारी आधीच एकजण बसला होता. चार किलोमीटर पुढे आल्यावर पुन्हा एक जण धुळ्याला जायचे म्हणून त्या गाडीत बसला. मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने गावाजवळ तवेरा गाडी आली असता चालका शेजारील बसलेल्या एका दरोडेखोराने अचानकपणे मागच्या सिटावर बसलेल्या तिघा व्यापार्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली.