बंद घरात चोरट्यांचा डल्ला

0

जळगाव । म हाबळ परिसरातील मोहन नगरात रविवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. चोरट्यांनी घरातील 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या घटनांमध्ये घट झाल्या होत्या. परंतू आता पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. तसेच उन्हाळ्यास सुरूवात झाली असून नागरिक घराच्या छतावर झोपण्यासाठी जातात ही संधी पाहून चोरटे घरफोडी करतात. त्यामुळे घरमालकांनी सुरक्षा बाळगावी तसेच घरात रात्री काही चोरट्यांच्या हालचाली दिसल्यास पोलिसांना संपर्क साधून लागलीच माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अयोध्यानगरात गेले होते कुटूंबीय
मोहननगरातील प्लॉट क्रमांक 96 गोपाळ रामदास सुतार यांच्या मालकीचे घर आहे. या घरात चार भाडेकरू राहतात. त्यातील महावितरण कंपनीचे निवृत्त कर्मचारी नारायण सुकदेव तांबे (वय 63) हे मुलगा राहूल (वय 32) आणि पत्नीसह राहतात. रविवारी त्यांच्या भावाकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. त्यामुळे नारायण तांबे आणि त्यांच्या पत्नी रविवारी दुपारीच आयोध्यानगरात गेले. तर मुलगा राहूल रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास कार्यक्रमस्थळी गेला. रविवारी रात्री उशिर झाल्याने सर्व तांबे कुटुंब आयोध्या नगरातच झोपले. सोमवारी सकाळी 6.30 वाजता घरी परत आले. त्यावेळी दरवाजाला कुलूप नव्हते. त्यांनी घरात जाऊन बघितले. तर लोखंडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते. घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली 4 तोळे वजनाची सोनसाखळी आणि 200 रुपये रोख असा एकूण 60 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. यानंतर त्यांनी लागलीच पोलिसात घरफोडी झाल्याची माहिती दिली. रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराची पाहणी केली. यानंतर दुपारी नारायण सुकदेव तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात जुन्या किमती प्रमाणे 59 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.