बंद घरावर चोरट्यांनी मारला डल्ला

0

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघनगरातील सेवानिवृत्त वन अधिकार्‍याच्या बंद घरात चोरट्यांनी घरफोडी केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त वन अधिकारी रामेश्‍वर भिकनराव सोनवणे (रा.वाघनगर, सावखेडा शिवार) हे त्यांचे मामा विनायक सैंदाणे यांचे निधन झाल्याने १६ऑगस्ट रोजी कुटुंबीयांसह नाशिक येथे कारने गेलेले होते. शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घरकाम करणारी मोलकरीण रेखा पवार या त्यांच्या घरी आल्या. या वेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. याबाबत रेखा यांनी मोबाईलव्दारे सोनवणे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर सोनवणे यांनी त्यांचे भाऊ ज्ञानेश्‍वर सोनवणे यांना घरी पाठविले. त्यांनी पाहणी केल्यानंतर घरफोडी झाल्याचे उघड झाले. सोनवणे कुटुंबीय सोमवारी घरी परतले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे समजले. या घरफोडीत लॉकरमधील रोख ३३ हजार, १० हजार रूपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॅप्स, १० हजारांचे सोन्याचे पेंडल, २ हजाराचे पैंजण व ५०० रूपये किमतीची चांदीची गणेश मूर्ती असा एकूण ६५ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.