बंद घर पर्वणी : उमवि विद्यापीठ कर्मचार्‍याच्या घरातून चार लाखांचा ऐवज चोरीला

धरणगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ कर्मचारी निवासस्थानात कर्मचार्‍याचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून तीन लाख 98 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी पाळधी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी
रवींद्र पांडूरंग गायकवाड (51, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी निवासस्थान, बांभोरी) हे विद्यापीठात नोकरीला असून मंगळवार, 24 मे रोजी रात्री 11 ते 25 मे रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील तीन लाख 89 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि नऊ हजार 500 रुपयांची रोकड मिळून तीन लाख 98 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. रवींद्र गायकवाड यांनी पाळधी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे.