1,016 कोटींच्या खर्चाची ई-निविदा प्रसिद्ध
सासवड : जिल्ह्यातील भोर, वेल्हे, पुरंदर तालुक्यांतील 21,392 हेक्टर शेतीच्या पाण्याचे वितरण करण्यासाठी वेल्हे येथील गुंजवणी धरणावरून बंद नलिका सिंचन प्रकल्प तांत्रिकदृष्ट्याही मार्गी लागला आहे. 1,016 कोटींच्या खर्चाची ई-निविदा प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे सासवड येथे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कार्यालयापुढे व गावोगावी कार्यकर्ते व शेतकर्यांनी जल्लोष साजरा केला.
मौजे धानेपमधील कानंदी नदीवरील 3.69 टिएमसी गुंजवणी धरण कित्येक वर्षे अडले होते. मात्र शिवतारे यांच्या प्रयत्नाने 13 वर्षांच्या खंडानंतर ते नुकतेच बांधून पूर्ण झाले. नंतरही प्रकल्पग्रस्तांनी अडथळे आणले. शिवतारेंनी प्रकल्पग्रस्तांच्या, तसेच जलसंपदा व महसूल अधिकार्यांच्या समवेत वारंवार बैठका घेऊन पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावले. पुढे धरणाचे काम वर्षाच्या आत सांडव्यासहीत पुर्ण झाले. दरम्यान राष्ट्रीय हरीत लवादापुढील लढाईनंतर धरणाचे गेट बंद करून 3.69 टीएमसी पाणीसाठा अखेर साठला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने व राज्यमंत्री शिवतारेंच्या पाठपुराव्याने प्रकल्पाच्या बंद नलिकाकामासाठी मंजुरी दिली.
निविदा प्रक्रीया सुरू
आता बंद नलिका कामाची निविदा प्रक्रीया सुरू झाली आहे. त्याबाबत ई-निवादा प्रसिध्द झाली व राज्यमंत्री शिवतारे समर्थकांनी सासवड कार्यालयापुढे फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. एक मोठा प्रकल्प दृष्टीपथात आल्याने काही गावांत शेतकर्यांनीही आनंद व्यक्त केला. बुधवारी सासवड येथील शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे तालुका प्रमुख व जि.प. सदस्य दिलीप यादव यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांची या विषयावर बैठक होऊन आनंद व्यक्त करण्यात आला.
लवकरच कामाला प्रारंभ
गुंजवणी प्रकल्पातील धरण पूर्ण करणे, त्यातील भूसंपादन, मोबदला, आंदोलने व न्यायालयीन लढाईचे अडथळे पार करणे, जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाच्या शेकडो अटींची पूर्तता करणे, नवीन सुप्रमानुसार मंजुरी मिळविणे, आर्थिक तरतूद, राज्यपालांची मोहोर व जलविद्युत प्रकल्पाच्या नावाखाली प्रकल्पात आणलेले अडथळे दूर करणे आदी कसरती पार करीत राज्यमंत्री शिवतारे यांनी मेहनत घेत, निविदा प्रक्रियेत हा प्रकल्प आणला. ही मोठी कामगिरी असून आता प्रक्रीया पूर्ण होताच काम सुरू होईल, असे दिलीप यादव यांनी सांगितले.
48 महिन्यांत काम पूर्ण करणार
अनेक वर्षांपासून शेतकरी गुंजवणीच्या पाण्याची वाट पाहत आहे. मला त्यातील सारे अडथळे पार करीत धरण पूर्ण करून दृष्टीपथात प्रकल्प आणता आला. याचे श्रेय जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विेशासाला जाते. ज्यांनी या कामांत अडथळे आणण्याचे पाप केले. त्यांचा लवकरच पुराव्यासह पर्दाफाश करणार आहे. कामाचे नियोजन 24 ते 30 महिन्यांचे असले तरी आम्ही 48 महिन्यांची अंतिम मुदत दिली आहे. अद्ययावत सुविधांमुळे हा प्रकल्प मुदतीआधीच पूर्ण झालेला दिसेल, असा विश्वास राज्यमंत्री शिवतारे यांनी व्यक्त केला.