भुसावळ । शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे गेल्या काही महिन्यांपासून बंदावस्थेत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस नागरिकांना अंधारात अडचणींचा सामना करावा लागत असतो. तसेच रात्रीच्या काळोखात महिला वर्ग देखील घराबाहेर निघण्यास धजावत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबींकडे लक्ष देऊन शहरातील पथदिवे लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सौर दिव्यांचा आधारही मिळेना
शहरात विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या 110 सौर दिव्यांपैकी अवघे आठ ते दहा दिवे सध्या सुरू असून उर्वरित दिवे बंद आहेत. शहरात नाहाटा महाविद्यालयापासून ते थेट यावल रोड तसेच जळगाव नाक्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गासह इतरही प्रमुख रस्त्यावर बसविण्यात आलेले पथदिवे बंदावस्थेत आहे. त्यामुळे रात्री शहरात काळोखाचे साम्राज्य निर्माण होत असते. याबाबत नागरिकांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन देखील या पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती.
दुरुस्तीचे काम होतेय कासवगतीने
आता पालिकेत निवडणूकीनंतर सत्तांतर झालेले आहे. मात्र यास दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला असूनही दुरुस्ती अद्यापही कासवगतीने सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीच्या या काळोखाचा गैरफायदा घेऊन चोरटे आपला हेतू साध्य करुन नागरिकांना झळ पोहचत आहे.
सार्वजनिक स्थळे अंधारात
शहरातील सार्वजनिक ठिकाणे, चौक, राष्ट्रपुरुषांचे पुतळे, पालिका प्रशासनाच्या इमारती, सामाजिक सभागृह, उद्याने, धार्मिक स्थळे आदींजवळ पालिकेने सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसवले आहेत. शहरातील तब्बल 110 ठिकाणी अशा प्रकारचे सौरदिवे बसवण्यात आले आहेत. मात्र, यातील बोटावर मोजण्याइतकेच अर्थात आठ ते दहा दिवे सध्या कार्यरत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवरील सेंट्रल पोल बंद असल्याने रस्त्यांवर अंधार आहे. त्यातच सौरऊर्जेवर चालणारे दिवेही बंद असल्याने शहरातील उद्याने, पालिका कार्यालय आदी ठिकाणी अंधार कायम आहे.