मुळशी । एका व्यक्तीने बांधलेला मातीचा बंधारा मंगळवारी (दि.25) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फुटल्याने माले गावाच्या मधलीवाडी परिसरातील 20 एकर क्षेत्रातील 19 शेतकर्यांच्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
डोंगरात एका व्यक्तीने शेतजमीन घेऊन तिथे मातीचा बंधारा बांधला होता. बंधार्यात जास्त पाणी साचल्याने तेथे कामासाठी ठेवलेल्या व्यक्तीने पाणी वाहून जाण्यासाठी एका बाजूने बांध कोरला. त्यामुळे बंधारा तुटला. बंधारा उंचावर असल्याने पाणी, गाळ, राडारोडा खालील बाजूस असलेल्या शेतकर्यांच्या शेतात वाहून आले. त्यामुळे तेथील भातपिकाचे नुकसान झाले. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने काही शेतकर्यांचे बांधही तुटले. चौंढाई देवीच्या मंदिराजवळील रस्ता गाळाने भरल्याने हा रस्ताही बंद झाला होता. मधलीवाडीला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पाइपलाइनही यामध्ये वाहून गेली. शेतातील राडारोडा काढून बांधबंदिस्ती करावी लागणार असल्याने या शेतकर्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दरम्यान मंडल अधिकारी मंगेश शिंगटे, तलाठी आर. पी. सरतापे, कोतवाल बापू साखरे यांनी बुधवारी (दि.26) या नुकसानीचा पंचनामा केला.