रावेर । येथील पंचायत समितीच्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने नवीन बंधारे आणि जुन्या बंधार्यांच्या दुरुस्तीची केलेली कामे निकृष्ठ आहेत. त्यावरील खर्च वाया गेला असून यात गैरव्यवहार करण्यात आला असल्याचा आरोप दोन सदस्यांनी केला होता. परिणामी निकृष्ठ कामांची पाहणी करू, अशी घोषणा पंचायत समिती सदस्यांनी केली होती. मात्र, या पाहणी दौर्यास अजूनही मुहूर्त गवसत नसल्याचे दिसून येत आहे. भाजपचे काही आजी-माजी सदस्यच या कामात गुंतल्याच्या चर्चेने प्रत्यक्ष पाहणीचा बार फुसका ठरला आहे.
कामांपोटी आतापर्यंत 1 कोटी 90 लाख रुपयांचे बिल अदा
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने 30 कामे हाती घेतली आहेत. त्यात 11 कामे साठवण बंधारे दुरुस्ती 19 कामे नवीन बंधार्यांची आहेत. या कामांपोटी आतापर्यंत 1 कोटी 90 लाख रुपयांचे बिल अदा झाले आहे. मात्र, ही सर्व कामे निकृष्ठ झाल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील आणि दीपक पाटील यांनी पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत केला होता. यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले. दुसरीकडे भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, अशा अविर्भावात पदाधिकारी-सदस्यांनी सर्व बंधार्यांची स्वत: पाहणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आतापर्यंत दोनवेळा पाहणी दौर्याचे नियोजन झाले. प्रत्यक्षात मात्र एकही सदस्य निकृष्ठ काम झालेल्या बंधार्यापर्यंत जाण्यास धजावला नाही. नियोजित पाहणी दौराही रद्द झाल्याने नेमकी माशी शिंकली कुठे? ही चर्चा सुरु झाली. तसेच हा विषय गुंडाळला जाणे शक्य आहे. निंभोरा-तांदलवाडी जिल्हा परिषद गटातील एका माजी पदाधिकारी, एक विद्यमान पंचायत समिती सदस्याने काही ठिकाणी बंधार्याची कामे केली आहेत. मात्र, रावेरातील आढावा बैठकीत या निकृष्ट कामांची बोंब फुटल्याने जिल्हा परिषदेतून संबंधितांची बिले रोखली गेल्याची आतल्या गोटातील माहिती आहे. असे असले तरी तेरी भी चूप, मेरी चूप या पद्धतीने प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न होत असल्याने सत्य समोर येईल का? हा प्रश्न आहे.