बंधुत्वाचे पर्व: रमजान ईद अर्थात ईद ऊल फित्र

0

मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फित्र व दुसरी ईदुल अज्जह. ईद उल फित्र ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.ईद उल फित्र हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फित्र म्हणजे धान्यदान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फित्र हा मुस्लिम शरियत कायद्यातील मापदंड आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहर्यावर आनंद खुललेला दिसतो. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिला वर्गात मोठा उत्साह दिसून येतो. पहिल्या दुसर्या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरवात करतात. मात्र, हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते, शहरी भागात सगळ्याच गोष्टी रेडीमेड मिळायला लागल्या आहेत. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केले जाते.

ईदच्या शुभ पर्वाला गरीब, अनाथ मुस्लिम बांधव आनंदापासून वंचित राहत असेल तर ती ईद मुस्लिम धर्मासाठी आनंदाची नाही, असे मानले जाते. मुस्लिम धर्मातील तळागाळातील व्यक्तीला ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा, यासाठी जकात व फित्रची तरतूद मुस्लिम धर्मामध्ये करण्यात आली आहे. जकात आणि फित्र हे ईदच्या आधी दिले जाते. कारण त्यांनीही या वर्षांतून एकदा येणार्‍या पावन पर्वाचा आनंद घ्यावा अशी यामागील भावना आहे. ईद त्यांचीच आहे ज्यांनी संपूर्ण महीनाभर रोजा(उपवास)ठेवला आहे. तसेच उपवासात खोटे बोलणे,निंदा करणे,कोणाविरूद्ध षडयंत्र करणे, द्वेष करणे,तिरस्कार करणे, अन्याय करणे, अवैध मार्गाने उत्पन्न मिळविणे, दारू पिणे-विकणे इत्यादी सर्व वाईट बाबींचा त्याग करून सत्कर्म आत्मसात केले आहे. आणि महिना भर उपासाच्या दरम्यान 15-15 तास अन्न-पाणी विना उपाशी-तापाशी राहून या गोष्टीची जाणीव करून घेतली की गरीब,वंचित ,शोषीत लोकं खायला अन्न नसल्यामुळे कसे जगत असतील. माझ्याकडे तर खाण्या-पिण्याची व्यवस्था आहे व ठराविक वेळेनंतर मी अन्न ग्रहण करू शकतो. परंतु त्यांचे कसे होत असेल ज्यांच्या 8-8 दिवस ,महीना-महीना भर अन्न-पाण्याची व्यवस्था होत नाही ,उपासमारीने त्यांना तडफडून मृत्यूला कवटाळावे लागते…!

या जाणीवेने अस्वस्थ होऊन गरीबांची मदत करावी. आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबाने आपल्या संपत्तीचा 2.3 भाग (जकात म्हणजे 1 लाखावर 2300) शोषीत,वंचीत, विधवा, अनाथ बालके, असहाय वृध्द मंडळी तसेच अन्य गरजूंना त्यांचा अधिकार म्हणून देणे अनिवार्य आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या वतीने सरासरी 2.5 किलोग्रॅम (म्हणजे घरात जर 10 सदस्य असतील तर 25 किलोग्रॅम) समाजातील गरीब,गरजू लोकांना दान करावे(फित्र-धान्य दान) महीनाभर सतत रोजा व तरावीह (रात्रीची विशेष नमाज) याद्वारे स्वतःला ईश्वराच्या आदेशाचे पालन करण्यासाठी समर्पित करावे. महिना भर कुराणाच्या आदेशाचे पठण-चिंतन करून या सर्व आदेशावर ईद-नंतर आचरण करण्यास कटीबद्ध होणे.(जर कोणी ईदनंतर त्याग केलेल्या वाईट गोष्टीवर पुन्हा आचरण करीत असेल तर त्याची महिना भराची प्रार्थना व रोजा निरर्थक ठरतील.)एक महिना सतत ईश्वराच्या आदेशाचे पालन करून मानव सेवेसाठी समर्पित जीवन जगण्यासाठी सज्ज होणे .(उपाशी राहून सुद्धा सत्य आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची तयारी रोजा मार्फत केली जाते ) ईदनंतर शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणे. अन्याय-अत्याचारा विरूद्ध संघर्ष करणे.आपल्या देशातील मूलभूत समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी जसे- उपासमारी-दारिद्रय, वेठबिगारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या,स्त्रियांवरील अत्याचार,बालमजूरी,भ्रष्टाचार,असमानता, वर्णवाद, भांडवलवाद, जातीयवाद, स्त्रीभ्रूणहत्या,दारुचे व्यसन,सावकारी,इत्यादी शोषण व्यवस्थेविरूद्ध संघर्ष करून देशाला सशक्त बनविण्यासाठी संघर्ष करणे. रमजानच्या महिन्यात ईश्वराने मुस्लीमांचे प्रशिक्षण घेऊन मानव सेवा आणि देशसेवेसाठी संघर्ष करणारे प्रामाणिक सैनिक तयार केले आहेत. (जे लोक अपेक्षित वागणार नाहीत त्यांना ईस्लाम समजला नसेल किंवा ते मुस्लीम असल्याचा आव आणत आहेत असे समजावे) ज्यांनी जकात दिली; धान्य दान केले त्यांनीच खर्‍या अर्थाने ईदची नमाज अदा करून ईद ऊल फित्र म्हणजे (धान्य )दान- उत्सव साजरा केला.

-अशफाक पिंजारी, जळगाव
9823378611.