बकरी ईदनिमित्त ताजमहलात मोफत प्रवेश !

0

नवी दिल्ली: जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ‘ताजमहल’मध्ये उद्या बकरी ईदनिमित्त तीन तास मोफत प्रवेश घेता येणार आहे भारतीय पुरातत्व विभागाने हा निर्णय घेतला आहे.

बकरी ईदच्या दिवशी विशेष नमाज पठणासाठी ‘ताजमहल’मध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक मुस्लिम नागरीक येत असतात. परिणामी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान तीन तासांच्या कालावधीत ‘ताजमहल’मध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, केवळ नमाज पठणासाठी नव्हे तर देश-परदेशातून येणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी नियोजित तीन तासांमध्ये मोफत प्रवेश असेल असं भारतीय पुरातत्व विभागाने जाहीर केलंय. १० वाजेनंतर पर्यटकांकडून नेहमीप्रमाणे शूल्क आकारले जातील. मोफत प्रवेशावेळीही सुरक्षिततेची संपूर्ण खात्री केली जाणार असून सर्वांची तपासणी केली जाईल. प्रवेश देताना पॉलिथिन पिशव्या, तीक्ष्ण वस्तू, काडीपेटी, लाइटर आणि खाद्य सामग्री इत्यादींवर बंदी असेल. पुरातत्वशास्त्रज्ञ बसंत कुमार स्वर्णकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

‘ताजमहल’साठी प्रवेशशुल्कानुसार भारतीय पर्यटकांना ५० रुपये द्यावे लागतात, तर परदेशी पर्यटकांना ११०० रुपये द्यावे लागणार आहेत. ताजमहालच्या मुख्य घुमटावर प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला २०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतात.