मुंबई । ‘बकेट लिस्ट’ या सिनेमाच्या निमित्ताने माधुरी पहिल्यांदाच सुपर बाइक चालवताना दिसली. या सिनेमात ती पुण्याच्या साने कुटुंबातील गृहिणीच्या भूमिकेत असून आपल्या आयुष्याच्या एका वळणावर ही गृहिणी थेट बाईकवर स्वार होते. यामागे नेमकी काय गोम आहे? हे चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला कळणार आहे. या भूमिकेसाठी अंगात बाईकर जॅकेट, डोक्यावर हेल्मेट आणि एखाद्या सुपरबाइकरप्रमाणे माधुरी दीक्षित दिसत आहे.
चित्रपटानिमित्ताने बालपणीच्या आठवणींना उजाळा
यावेळी सिनेमाच्या निमित्ताने सुपरबाइक चालवण्याचा अनुभव तर घेतलाच, शिवाय पुण्यात भावंडांबरोबर धमालही केल्याचे माधुरी म्हणाली. याशिवाय पुण्यातल्या पर्वती, शिंदेछत्री अशा कितीतरी ऐतिहासिक ठिकाणांना तिने भेटीही दिल्या. ’आम्ही भावंडे इथे वेड्यासारखे भटकलो आणि चिंचा, बोरं, करवंदांवरही ताव मारला. या भूमिकेसाठी पुणेकरांचा हजरजबाबीपणा आणि टोमणेदार विनोदी बोलणेही मी आत्मसात केले’, असे माधुरीने म्हटले आहे.
माधुरीचा ग्लॅमरस लूक!
बकेट लिस्ट सिनेमाच्या निमित्ताने रसिकांना नेहमीपेक्षा वेगळी माधुरी पाहायला मिळणार असल्याचं दिग्दर्शक तेजस विजय प्रभा देऊस्कर यांनी म्हटले आहे. ‘माधुरीची हिरोइनची इमेज बाजूला ठेवून तिला या सिनेमातल्या भूमिकेसाठी डी-ग्लॅम लूक आम्ही दिला. या लूकमध्येही माधुरी खूप सुंदर दिसत असल्याचे म्हणत या भूमिकेसाठी आपले सर्वस्व ओतून तिने काम केल्याचे देऊस्कर यांनी म्हटले आहे. माधुरीची ही वेगळी छबी चाहत्यांना नक्कीच आवडेल, असा विश्वासही देऊस्कर यांनी दाखवला आहे.