बख्खळ सुपार्‍यांच्या आशेने तमाशापंढरी गजबजू लागली!

0

पुणे। महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशाची पंढरी म्हणून सर्वज्ञात असलेल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये तमाशा फडाच्या 29 राहुट्या दाखल झाल्या आहेत़ राज्यात पुढील काळात सुरू होणार्‍या यात्रा- जत्रांसाठी तमाशाच्या सुपार्‍या या ठिकाणी घेतल्या जातात.़ अक्षय्य तृतीयेपर्यंत या राहुट्यांचे वास्तव्य तेथे राहणार आहे़ पूर्ण राज्यात नारायणगावातील या फडांची ख्यातील आहे.

सुविधा देण्याची गरज
यावर्षी अपुर्‍या जागेत तमाशा राहुट्या उभारल्या जाणार आहेत. काही तमाशांना अत्यंत छोट्या जागेत आपली राहुटी उभारावी लागणार आहे़. लगतच ड्रेनेज उघड्यावर असल्याने डासांचा मोठा प्रादुर्भाव फडाच्या परिसरात झाला आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी कनेक्शन दिले आहे. परंतु, त्याला कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे राहुटीतील फडमालक/व्यवस्थापकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

राज्यातील नावाजलेले फड
नारायणगावात बाळ आल्हाट नेतवडकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकरसह तुकाराम खेडकर, हरिभाऊ बढेसह नंदाराणी नगरकर, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, दत्ता महाडिक पुणेकर, कुंदा पाटील पुणेकर, मालती इनामदार नारायणगावकर, काळू-नामू वेळवंडकर, जगनकुमारसह हौसा वेळवंडकर, संध्या माने सोलापूरकर, संभाजी जाधव संक्रापूरकर, रघुवीर खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, अंजली नाशिककर, ईश्वरबापू पिंपरीकर, छाया बारामतीकर, भिका-भीमा सांगवीकर, मंगला करवडीकर, मनीषा सिद्धटेककर, नंदाराणी साकुर्डीकर, वामनराव मेंढापूरकर, सर्जेराव दावडीकर, उषा खोमणे औरंगाबादकर, संगीता पुणेकर, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ, प्रकाश अहिरेकरसह नीलेशकुमार अहिरेकर, पुष्पा बरडकर कृष्णा वाघमोडे, सुनीता बारामतीकरसह रमेश खुडे आदी फडांचा समावेश आहे.

चांगल्या बुकिंगची आशा
या तमाशापंढरीत राज्यातील कानाकोपर्‍यांतून ग्रामस्थ, स्थानिक पुढारी, पंच, यात्रा उत्सव समितीचे सदस्य येऊन गावातील यात्रा-जत्रेसाठी लोकनाट्य तमाशा खेळाचे बुकिंग करतात़ गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने व यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणनुकाही पार पडलेल्या असल्याने यात्रा- जत्रांसाठी चांगले बुकिंग होईल, अशी आशा फडमालकांना वाटते आहे.