बगलबच्च्यांना लगाम घाला

0

कोल्हापूर : राजू शेट्टींनी आपल्या बगलबच्च्यांना लगाम घालावा. अन्यथा त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टींना दिला आहे. शेट्टी यांनी सदाभाऊंवर केेलेल्या टीकेलाही त्यांनी यावेळी रोखठोक उत्तर दिले. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

सदाभाऊ खोत वाट चुकलेत, पण त्यांना परत आणू, आमच्या मिशांना कुणाचे खरखटे लागलेले नाही, असे वक्तव्य राजू शेट्टींनी नुकतेच केले होते. तसेच शनिवारी पुण्यातही त्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकार नसतात, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या सदाभाऊंना लक्ष्य केले. या टीकेला त्यांनी शनिवारी कोल्हापूरात उत्तर दिले.

सदाभाऊ खोत म्हणाले, मी आत्मक्लेश यात्रेपासून लांब राहावे असे राजू शेट्टी यांना वाटत असेल तर हरकत नाही. मी मळलेल्या वाटेवरुन चालणार कार्यकर्ता नाही. सदाभाऊ स्वतःची वाट स्वतः निर्माण करतो. कोणाला तरी बरे वाटावे म्हणून मी काम करत नाही. मी चळवळीत वाढलेला कार्यकर्ता आहे. सदाभाऊ राजपुत्राच्या घरात जन्माला आलेला नाही. मी इथे आलेलो आहे ते लाठ्याकाठ्या खाऊन. त्यामुळे आमच्या मिशीला खरकटे लागलेले आहे असं कुणाला वाटत असेल तर त्यांनी नाकाला रुमाल लावून घ्यावा. आम्ही आमच्या मिशा पुसून स्वच्छ जाऊ, असे सदाभाऊ म्हणाले.