नवी दिल्ली : बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा भारतीय रिझर्व्ह बँकेने 20 फेब्रुवारीपासून वाढविली असून, आता आठवड्याकाठी 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. तर ही मर्यादा 13 मार्चपासून पूर्णतः हटविली जाईल, अशी माहिती आरबीआयच्यावतीने देण्यात आली. गेल्या 8 फेब्रुवारीला या संदर्भात आरबीआयने घोषणा केली होती. त्यानुसार, सोमवारपासून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच, भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम काढून घेणे किंवा पेन्शन मिळणे यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करावी न लागता लवकरच ही कामे ऑनलाइन होण्याची शक्यता आहे. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनची (ईपीएफओ) ही बहुचर्चित सुविधा येत्या मे महिन्यापासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.
चलन तुटवडा संपला..
8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी लागू केल्यानंतर बँक व एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कमी करण्यात आली होती. सुरुवातीला दोन हजार नंतर चार हजार पाचशे आणि आता 24 हजार अशी पैसे काढण्याची मर्यादा होती. आता मंगळवारपासून ही मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर 13 मार्चपासून कितीही पैसे काढता येतील, अशी माहिती आरबीआयने अधिसूचनेद्वारे दिलेली आहे. जी रक्कम एटीएमद्वारे काढली जाते, ती रक्कम बचत खात्यातून काढल्याचे गृहीत धरले जाणार आहे. 1 जानेवारीपासून आरबीआयने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा 10 हजार रुपये केली होती तसेच करंट खात्यातून किती पैसे काढण्याची मुभा दिली होती. सध्या बाजारपेठेतील चलन तुटवड्याची स्थिती संपुष्टात आली असून, एटीएम बाहेरील रांगा संपल्या आहेत.
पीएफ विभागीय कार्यालये केंद्रीय सर्व्हरशी जोडणार
पीएफ काढून घेण्याचा अर्ज, पेन्शन मिळणे किंवा समूह विम्याचा फायदा मिळणे याबाबत ‘ईपीएफओ’ दरवर्षी अंदाजे एक कोटी अर्ज येतात. त्यांच्यावरील प्रक्रिया वेगाने होण्यासाठी सर्व 123 विभागीय कार्यालयांना केंद्रीय सर्व्हरशी जोडण्याचे काम सुरू आहे. सर्व प्रकारचे अर्ज ऑनलाइन सादर करता यावेत, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे ईपीएफओ आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी सांगितले. अर्ज ऑनलाइन सादर केल्यानंतर काही तासांमध्येच भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम काढून घेणे किंवा पेन्शन मिळणे ही कामे ऑनलाइन पूर्ण केली जाईल, असे जॉय यांनी सांगितले.