बचत गटांचे काम सावकारीपुरता न राहता प्रत्यक्षात व्यवसायही साकारावेत

0

कृषिभूषण सीताबाई मोहिते यांचा महिलांना सल्ला ; बहिणाबाई महोत्सवात दिवसभरात विविध कार्यक्रम

भुसावळ- प्राथमिक शिक्षणाला मर्यादा असल्यातरी जीवन जगण्याचे शिक्षण घेण्यासाठी कुठल्याही मर्यादा नाहीत. आपण सोने विकत असलोतरी त्याचे पॅकेजिंग व्यवस्थित नसल्यास तेदेखील विकले जात नाही त्यामुळे जगातल्या मार्केटींगचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. वर्षातून एकदा महोत्सवात स्टॉल लावण्याऐवजी सातत्याने वर्षभर व्यवसाय करायला हवा व बचत गटांचे काम केवळ सावकारीपुरता मर्यादीत न राहता प्रत्यक्षात कर्जाच्या रकमेतून व्यवसाय साकारले जावेत, अशी टीप्स कृषिभूषण पुरस्कारप्राप्त जालन्याच्या उद्योजिका सीताबाई मोहिते यांनी बहिणाबाई महोत्सवात जमलेल्या बचत गटांच्या महिलांसह उपस्थितांना दिल्या. गुरूनाथ फाऊंडेशनतर्फे पाच दिवसीय बहिणाबाई महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी रविवारी तीन सत्रात कार्यक्रम घेण्यात आले. दुपार सत्रात महिलांना मार्गदर्शन तर सायंकाळी सत्रात तीन वयोगटात फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसेच रात्रीच्या सत्रात सांस्कृतिक कला निकेतन निर्मित व मुकेश खपली दिग्दर्शित ‘कान्हदेशाची लोकधारा’ या नाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

दोनशे रुपयात उद्योगाची केली उभारणी
निरक्षर असलेल्या मात्र यशस्वी उद्योजिका असलेल्या सीताबाई मोहिते यांनी आपल्या आयुष्याचा जीवनपट उलगडताना अवघ्या दोनशे रुपयांपासून उद्योगाला सुरुवात केली असल्याचे सांगत आज एका मोठी उद्योजिका झाल्याचे सांगत आयुष्यातील अनेक खडतर प्रसंग सांगितले. पुर्वी मडक्या-गाडघ्यात महिलांची बचत ठेवली जायची मात्र आता बचत बँक आली आहे मात्र त्याकडेही पुरूषांची नजर वळली असल्याचे त्यांनी सांगत बचत गट केवळ सावकारीपुरता मर्यादीत न राहता प्रत्यक्षात उद्योग उभे रहायला हवेत, असे त्यांनी सांगितले. आत्मविश्‍वास असल्यास यश हमखास मिळतेच असा अनुभवही त्यांनी सांगितला. जालन्यात पाण्याचा प्रचंड टंचाई आहे, शेतीसाठी पाणी नाही मात्र फॅक्टरीच्या अंडरग्राऊंडला दोन लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ उभारला असून या पाण्यातून एप्रिल महिन्यात शेती केली जाते, असे सांगून त्यांनी आंब्याची जात विकसीत केली असून वर्षातून त्यातून दोनदा पीक घेता येतो व आंब्याची ही जात ‘रासमो’ नावाने रजिस्टर केल्याचे त्या म्हणाल्या.

यशस्वी उद्योजकाची अशी आहे त्रीसुत्री
सीताबाई मोहिते यांनी यशस्वी उद्योजकाची त्रीसुत्री सांगत महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला. त्या म्हणाल्या की, उद्योजकाचे डोके हे थंड बर्फासारखे असायला हवे, जीभ खडीसारखेसारखी गोड व डोक्यात राग यायलाच नको, हे जमल्यास उत्तम उद्योजक होता येते, असे त्याीं सांगत उद्योगात चढ-उतार हे होत राहतात मात्र मालाचा दर्जा (क्वालिटी) हे नेहमीच चांगलीच असायला हवी, असे सांगून त्यांनी नोकरीत माणुस सेवानिवृत्त होतो मात्र उद्योगातून तो कधीही निवृत्त होत नसल्याचे सांगितले. उद्योग उभारताना उधारी मोठी डोकेदुखी आहे मात्र प्रत्येक बचत गटात एकतरी भांडकुदाळ स्त्री असते, तिचा उधारी वसुलीसाठी वापर करा व वसुली झाल्यानंतर पुन्हा ग्राहकाशी नाते जोडण्यासाठी एखाद्या गोड स्वभावाच्या सदस्याला पाठवून ग्राहकाशी नाळ टिकवून ठेवा, असा सल्लाही त्यांनी महिलांना दिला.

जिद्दीने आकाशालाही घालू शकतो गवसणी -लताबाई करे
पतीच्या उपचाराला पैसे नसल्याने अनवाणी तीन किलोमीटर धावून ज्येष्ठांच्या शर्यतीत प्रथम आलेल्या लताबाई करे (मेहकर, जि.बुलढाणा) यांचेही महिलांसाठी व्याख्यान झाले. त्या म्हणाल्या की, मनात जिद्द असेल तर कुठलीही गोष्ट साध्य करणे शक्य आहे. पतीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले. समोर स्पर्धक कोण आहेत याचा विचार केला नाही केवळ शर्यत आपल्याला जिंकायची आहे या जिद्दीने पळाले अन् जिंकलेही त्यामुळे तुम्हीदेखील जिद्द ठेवून काम करा, यश निश्‍चित मिळेल. आपल्या जीवनावर ‘लता भगवान करे एक संघर्षगाथा’ या नावाचा हिंदी चित्रपट येत असून आपली त्यात प्रमुख भूमिका आहे. हैद्राबादच्या पतनज्योती क्रिएशनचे डायरेक्टर प्रतीक कचरे यांचा हा चित्रपट असल्याचे त्या म्हणाल्या.

मासिक पाळी आहे म्हणून आहे जग -यती राऊत
स्टेप अप इंडियाच्या अध्यक्षा यती राऊत आपल्या व्याख्यानात म्हणाल्या की, मासिक पाळी आल्यानंतर महिलेकडे अवहेलनेने पाहिले जाते मात्र मासिक पाळी असल्यानेच हे जग आहे कारण हे वरदान केवळ स्त्रियांना निसर्गाने दिले आहे. बचत गटांनी आधूनिकतेची कास धरत जीएसटी सोबत आयटी रीटर्न भरावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.नाना पाटील, खासदार रक्षा खडसे, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, बेटी बचावो, बेटी पढाओचे राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र फडके, शिक्षण समिती सभापती पोपटतात्या भोळे, जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे, जिल्हा परीषद सदस्य आत्माराम कोळी, पंचायत समिती उपसभापती मनीषा उन्हाळे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, नगरसेवक युवराज लोणारी, मनोज बियाणी, प्रमोद सावकारे, सविता मकासरे, पुरूषोत्तम नारखेडे, वसंत पाटील, माजी सभापती सुधीर महाजन, शैला पाटील, अलका शेळके, पल्लवी चौधरी, शिंदे अ‍ॅकेडमीचे अमोल शिंदे आदींची उपस्थिती होती.

‘कान्हदेशाची लोकधारा’ महानाट्याने मिळवली दाद
सायंकाळच्या तीन गटात झालेल्या फॅन्सी स्पर्धांना उपस्थितांनी दाद दिली तर सायंकाळी सांस्कृतिक कला निकेतन निर्मित व मुकेश खपली दिग्दर्शित ‘कान्हदेशाची लोकधारा’ या नाट्याचे सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. तब्बल 75 स्थानिक कलावंतांचा या महानाट्यात सहभाग राहिला. दरम्यान, रविवारी हर्षाली चंद्रकांत सैंदाणे (धुळे), सीताबाई वनराज मोहिते (जालना), यती राऊत (पालघर), लता भगवान करे (बारामती), डॉ.जुही रवींद्र पवार (मुंबई), नीशा दिलीप पाटील (भडगाव), प्रभावती सुधीर पाटील (भुसावळ), ज्योती लिलाधर राणे (जळगाव) यांना बहिणाबाई पुरस्काराने गौरवण्यात आले.

आज शिक्षणमंत्री साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
सोमवार, 10 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता प्रा.यजुर्वेंद्र महाजन हे ‘उत्तुंग भरारी घेऊया’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमास शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहून शिक्षक व पालकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता जळगाव परीवर्तन आयोजित ‘अरे संसार संसार’ या बहिणाबाईंच्या गीतांवर कवितांची सुरेल मैफल रंगणार असून त्यानंतर सायंकाळी सात वाजता एन.सी.सरकार, नागपूर यांचा बच्चे कंपनीसाठी मॅजिक शो तर रात्री आठ वाजता स्थानिक कलावंतांना कलागुण सादरीकरणासाठभ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सोमवारी या रणरागिणींचा ‘बहिणाबाई’ पुरस्काराने होणार सन्मान
नीता पिलिक बनवट (जळगाव), डॉ.नीलिमा संजय नेहेते (भुसावळ), सुरेखा वामन जावळे (यावल), साधना बन्सीधर लोखंडे (मोहाडी), सुनंदा मुकुंदा औधकर (भुसावळ), मंगला भीमराव पाटील (भुसावळ), प्रतीमा निलेश नाहटा (मेहकर), राजेश्री राजधर सुरवाडे (भुसावळ).