बचत गटांना व्यावसायिक मार्केटींगची गरज – आमदार लक्ष्मण जगताप

0
महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात यश न आल्याची खंत 
सांगवीत पवनाथडी जत्रेचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड : शहरातील महिला बचत गटांना पाठबळ देणे हे पवनाथडी जत्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी बचत गटांनी आपल्या व्यवसायासाठी मार्केटिंग करणे गरजेचे आहे, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने नवी सांगवी येथे दि. 04 ते 08 जानेवारी 2019 दरम्यान आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेचे उदघाटन आंतरराष्ट्रीय नेमबाज व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रँड अंम्बेसीडर अंजली भागवत यांच्या हस्ते शुक्रवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती…
यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, शिक्षण समिती सभापती प्रा.सोनल गव्हाणे, जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य संतोष कांबळे, हर्षल ढोरे, विलास मडिगेरी, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, शीतल शिंदे, नामदेव ढाके, नगरसदस्या शारदा सोनवणे, उषा ढोरे, सुजाता पालांडे, सुनिता तपकीर, अश्‍विनी जाधव, सुवर्णा बुर्डे, हिराबाई घुले, आशा शेडगे, स्वीकृत सदस्य वैशाली खाडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, आशा राऊत, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, कार्यकारी अभियंता केशव फुटाणे, सहाय्यक समाजविकास अधिकारी सुहास बहादरपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला सबलीकरणासाठी जत्रेचे आयोजन…
यावेळी आमदार जगताप म्हणाले, महिला सबलीकरणासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. महानगरपालिकेमधील पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करावेत. गेली अनेक वर्षे पवनाथडीचे आयोजन करून देखील महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात यश न आल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. पवनाथडी जत्रेचा उद्देश साध्य होत नसल्यास पुढील वर्षी पवनाथडी जत्रेचे आयोजन करावे कि नाही याबाबत विचार करावा लागेल असेही ते म्हणाले.
बचत गटांना मिळाली चालना…
महापौर राहुल जाधव म्हणाले, शहरातील कला-कौशल्य असलेल्या महिलांना हक्काची बाजारपेठ देण्यासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते. पवनाथडी जत्रेमुळे अनेक महिला बचत गटांना चालना मिळाली व स्वतंत्र अशी ओळख मिळाली. शहरातील नागरिकांनी आपल्या शहरातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पवनाथडी जत्रेला भेट द्यावी. महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे म्हणाल्या, सर्व अडचणींना सामोरे जाऊन आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. महानगरपालिकेतर्फे महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. महिलांमधील उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन केले आहे असेही त्या म्हणाल्या.
813 महिला बचत गटांचे स्टॉल…
यावर्षी पवनाथडी जत्रेमध्ये 361 सर्वसाधारण स्टॉल्स, 247 शाकाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तर 205 मासांहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असे एकूण 813 स्टॉल्स आहेत. याबाबत अंजली भागवत म्हणाल्या, पवनाथडी म्हणजे उद्योजक महिलांचे ऑलिम्पिक असल्यासारखेच आहे. पवनाथडीच्या माध्यमातून महिला उद्योजकांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. महिला उद्योजकांनी व्यवसायामध्ये आत्माविश्‍वासाने पुढे जावे, असेही त्यांनी सांगितले.उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आभार मानले.