बंगळुरू । भारतीय संघाला आपल्या बचावफळीला मजबूत करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे कोणत्याही संघाविरूध्द आक्रमण करण्याच्या ताकदीत वाढ होईल. त्यामुळे प्रतिस्पर्धीसंघावर एकाप्रकारे दबाव निर्माण होईल असे नवनियुक्त विश्लेषक प्रशिक्षक हॅन्स स्टरीडर यांनी सांगितले. नेदरलँड येथील 58 वर्षीय प्रशिक्षकांनी भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्र येथे म्हटले की, ‘भारतीय संघाने आपला डिफेन्स भक्कम करावा.
बचाव फळी मजबूत असल्यास आक्रमक होता येते
बचाव फळी भक्कम झाल्यास तुम्हाला बिनधास्तपणे आक्रमण करता येईल.’ ‘साई’ केंद्रात 33 कोर संभाव्य खेळाडू पुढील महिन्यात सुरू होणार्या सुल्तान अजलन शाह चषकासाठी ट्रेनिंगमध्ये गुंतले आहेत. भारतीय संघ गेल्यावर्षी उपविजेता ठरला होता.स्टरीडर आणि मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी बांगलादेशात होणारी आशिया चषक आणि या वर्षअखेरीस भुवनेश्वर येथे होणारी हॉकी विश्व लीग फायनलवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
खेळाडूंना ताजेतवाने ठेवणे मोठे आव्हान
हंगामात खेळाडूंना ताजेतवाने ठेवणे हे सर्वांत मोठे आव्हान असल्याचे स्टरीडर यांना वाटते. ते म्हणाले, ‘तुम्ही मैदानावर जे काही करता त्यात ताजेतवाने असणे महत्त्वाचे आहे. जास्त त्रासन होता उत्साहित राहावे यासाठी ड्रिल्स नवीन असायला हवी; मी याआधीहीदेखील रोलँट ओल्टमन्स यांच्यासोबत काम केले आहे. त्यांना माझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे मला माहीत आहे. त्यामुळे माझ्यासाठी सर्व बाबी सुकर होतात.’