मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही लागणार नसल्याची स्थिती आहे. त्यासाठीच ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी राजभवनावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. यावेळी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडवला. तसेच बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर कडू यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनांसमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्यपालांची भेट घेण्याची मागणी त्यांनी केली होती, मात्र राज्यपाल त्यांना भेटले नाही.
राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य तो निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेची दखल घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली होती.
तसेच शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे गांभीर्य राज्यपालांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांनी आज मुंबईत मोर्चा काढला. राजभवनाकडे जाणारा हा मोर्चा पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडवला. तसेच बच्चू कडू आणि त्यांच्यासह आंदोलनात सहभागी असलेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळले.