प्राणी संरक्षण कायदान्वये गुन्हा दाखल
पिंपरी : अहमदनगरहुन मुंबईला गोमांस घेऊन जात असलेला टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. ही कारवाई आज (मंगळवारी) पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. कारवाईत सहा टन गोमांस जप्त करण्यात आले. मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यानुसार कसायांना सहकार्य करणार्या शेतकरी, कसाई, गोमांस विकत घेणारा गनीभाई, टेम्पोचा चालक व मालक यांच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित 1995 चे कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा रचून टेम्पो पकडला
कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगरमधील कुरेशी हॉटेलच्या मागच्या गल्लीतून गायी व बैल कापून त्याचे मांस मुंबई येथे विक्रीसाठी टेम्पोतून (एम एच 03 / सी पी 1630) घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यानुसार कार्यकर्त्यांनी जुना पुणे-मुंबई महामार्गावर मध्यरात्री सापळा रचून पहाटे तीनच्या सुमारास संबंधित टेम्पो थांबविला. टेम्पोचे माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या समक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देशपांडे आणि शिवशंकर स्वामी यांनी टेम्पोची तपासणी केली. टेम्पोमध्ये गायी व बैलांची मुंडकी, मोठे मांस व पाय आढळले. पिंपरी पोलिसांनी टेम्पो चालक अब्दुल रहमान अति महंमद खान व क्लिनर अहसान महंमद यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, टेम्पोत सहा टन मांस आहे. हे मांस अहमदनगर येथून गायी व बैल कापून मुंबई येथील गनीभाई याच्याकडे घेऊन जात असल्याचे सांगितले.
ही कामगिरी कुणाल साठे, अभिजित शिंदे, उपेंद्र बलकवडे, सचिन जवळगे, गौरव पाटील, श्रीकांत कोळी या गोरक्षकांनी केली. त्यासाठी पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. ठुबल आणि पोलिस कर्मचा-यांनी कारवाईसाठी सहकार्य केले असल्याची माहिती समस्त हिंदू आघाडी गोरक्षण विभागाकडून देण्यात आली.