बजरंग दलाच्या 20 शाखांचे शहरात उद्घाटन

0

पिंपरी-चिंचवड : शहरामध्ये रविवारी बजरंग दलाच्या एकूण 20 शाखांचे उद्घाटन करण्यात आले. ‘कश्मीर तो होगा, पर पाकिस्तान नहीं होगा’ या कवितेद्वारे प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान निर्माण करणार्‍या साध्वी सरस्वती देवी यांच्या हस्ते या सर्व शाखांचे उद्घाटन करण्यात आले. बजरंग दलाच्या वतीने पिंपरी येथून सकाळी भव्य रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीने 20 ठिकाणी पोहचून शाखांचे उद्घाटन केले.

या ठिकाणी शाखा
पराग ढोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीगाव येथील भैरवनाथ चौकातून बजरंग दल कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढली आणि या रॅलीने शहरभर भ्रमण करत शाखांचे उद्घाटन केले. सर्वात प्रथम पिंपरी शाखेचे उद्घाटन झाले. त्यानंतर रहाटणी गावठाण, काळेवाडी भारतमाता चौक, थेरगाव बापूजी बुवा मंदिर, गणेशनगर खिंवसरा पाटील व्यायामशाळा, मानकर चौक, वाकड हनुमान मंदिर, पिंपळे सौदागर छत्रपती चौक, पिंपळे गुरव मारुती मंदिरासमोर, सांगवी गंगानगर चौक, कासारवाडी गारजाई चौक, भोसरी पीसीएमटी चौक, मोशी भारतमाता चौक, चिखली सावतामाळी मंदिराशेजारी, तळवडे गणेशनगर, रुपीनगर एकता चौक, राहुलनगर, वाल्हेकरवाडी मनपा शाळा मेन चौक, चिंचवड चाफेकर चौक, चिंचवड तालेरा हॉस्पिटल आणि चिंचवडगाव येथे शेवटच्या शाखेचे उदघाटन साध्वी सरस्वती यांच्या हस्ते झाल्यावर सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
चिंचवड येथे सर्व शिवभक्त कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भर पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. देशभक्तीपर घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला होता. यावेळी मृणालिनी पडवळ (संयोजिका, पश्चिम महाराष्ट्र प्रांत दुर्गा वाहिनी), संतोष भेगडे पाटील (संयोजक, पश्चिम महाराष्ट्र प्रांत बजरंग दल), कुणाल साठे, अभिजीत शिंदे, पराग ढोरे, प्रशांत ढोबळे, विजयराज दास उपस्थित होते.