बजरंग पुनियाला सुवर्णपदक

0

आशागाट । भारताच्या बजरंग पुनियाने 65 किलो गटाच्या फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत बाजी मारत तुर्केमिनीस्तानमधील आशागाट येथे सुरू असलेल्या पाचव्या आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर टाकली. या सुवर्णपदकाशिवाय शीतल तोमर आणि नवज्योतकौर यांनी अनुक्रमे 48 किलो आणि 69 किलोगट आणि क्रिष्षन शशीकरण याने देशाला बुद्धिबळ स्पर्धेत देशाला कांस्यपदक मिळवून दिले.

बजंरगने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत अनुक्रमे इराण आणि यजमान तुर्केमिनीस्तानच्या पहिलवानांना हरवत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. अंतिम फेरीत बजरंगसमोर जपानच्या दाईची टाकातानीचे आव्हान होते. पण दाईचीच्या धुसमुळ्या खेळामुळे बजरंगला विजयी घोषीत करण्यात आले. बजरंगने याआधी आशियाई अजिंक्यपद कुस्तीस्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली होती. बजरंगाच्या या सुवर्णपदकामुळे स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या सहावर पोहोचली आहे.

बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक
सोमवारी भारताला तिसरे कांस्यपदक बुद्धिबळ स्पर्धेत मिळाले. पुरुषांच्या स्टॅडर्ड वैयक्तिक लढतींमध्ये क्रिष्णन शशिकरण याने कांस्यपदक जिंकले. नवव्या दिवसअखेर गुणतालिकेत भारत 12 व्या स्थानावर होता. भारताच्या खात्यात सहा सुवर्णपदकांसह सात रौप्यपदके आणि 11 कांस्यपदकांचा समावेश आहे.

महिला कुस्तीत दोन कांस्यपदके
स्पर्धेच्या नवव्या दिवशी कुस्तीमध्ये शीतल तोमर आणि नवज्योतकौरने रिपेच लढतींमध्ये कांस्यपदक जिंकले. पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या रुपिंदरकौरला 11-0 असे पराभुत करणार्‍या शीतलला उपांत्यपूर्व लढतीत चीनच्या यानन सुनकडून पराभव पत्कारावा लागला. रिपेच लढतीत शीतलने फिलीपाईन्सच्या ग्रेस लॉबेरनेसला पराभूत केले. कांस्यपदकाच्या लढतीत शीतलने इंडोनेशियाच्या एका अर्फेंडाला मात दिली. नवज्योतकौरनेही चांगली सुरुवात करताना इंडोनेशियाच्या देसी सिनटा आणि तुर्केमिनीस्तानच्या मामाजान साय्येवाचा पराभव केला होता. उपांत्य फेरीत चीनच्या फेंग झोऊने हरवल्यामुळे नवज्योतला रिपेच लढतीचा सहारा घ्यावा लागला. रिपेच लढतीत नवज्योतकौरने तुर्केमिनीस्तानच्या सोल्माझ बोझागॅनोव्हाला हरवून कांस्यपदक निश्‍चित केले.