कामगारांना पूर्ववत घेण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड : बजाज कंपनीच्या व्यवस्थापन प्रतिनिधींनी 6 बडतर्फ कामगारांना कामावर रुजू करून घेण्याचे मान्य केले. तसेच आकुर्डी आणि चाकण करार मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी उपोषण मागे घेतले. त्यांनी गेल्या पाच दिवसांपासून प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण चालू केले होते. गेले दोन दिवस व्यवस्थापनासोबत संघटनेच्या पदाधिकार्यांची चर्चा चालू होती.
वेतन करार मार्गी!
या चर्चेदरम्यान व्यवस्थापन प्रतिनिधींनी 6 बडतर्फ कामगारांना कामावर रुजू करुन घेण्याचे व आकुर्डी व चाकण वेतन करार मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारूतराव जगदाळे यांनी दिलीप पवार यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर पवार यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली.
कामगार आनंदित
यावेळी नगरसेविका सुलभा उबाळे, मारूती भापकर, नगरसेवक केशव घोळवे, ऑप्शन पोसिचीव्हचे अध्यक्ष अरविंद श्रोती, नागरी हक्क समितीचे अध्यक्ष संतोष कणसे, जनरल सेक्रेटरी महेश खानापूरकर आदी उपस्थित होते. दरम्यान, चाकण व आकुर्डी प्रकल्पातील वेतन करार मार्गी लागणार असल्याने तसेच बडतर्फ कामगारांच्या प्रश्नावर व्यवस्थापन सकारात्मक असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.