बजाज ऑटो आणि ट्रायम्फ मोटारसायकल यांची जागतिक भागीदारी

0

पिंपरी-चिंचवड : बजाज ऑटोने जागतिक बाजारात पदार्पण करण्यासाठी ब्रिटनच्या ट्रायम्फ मोटारसायकल कंपनीसोबत भागीदारी केली आहे. दोन्ही कंपन्या मिळून मध्यम श्रेणीच्या मोटारसायकलची निर्मिती करणार आहेत. नवीन येणार्‍या मोटारसायकलीत आकर्षक रचना आणि तांत्रिक सुधारणा या गोष्टींना प्राधान्य देण्यात येणार आहे. नवीन येणार्‍या मोटारसायकलीत दोन्ही कंपन्यांचे वैशिष्ट्यपूर्ण भाग बसवल्यामुळे तिची गुणवत्ता सुधारून जागतिक स्पर्धेत ती मोठ्या ताकदीनिशी उतरणार आहे.

जागतिक स्पर्धेला सामोरे जाणार
दोन्ही कंपन्यांच्या वतीने संयुक्तपणे यासंदर्भात माहिती जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही कंपन्या भागीदारीतून बाजारातील ब्रॅण्डची स्थिती, गाडीची रचना आणि विकास तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि किंमत यांच्यातील स्पर्धेला सामोरे जाणार आहेत. जागतिक वितरणप्रणाली प्रस्थापित करण्याच्या संधी दोन्ही कंपन्या शोधत आहेत. दोन्ही कंपन्यांचे सामूहिक तंत्रज्ञान वापरून मध्यम श्रेणीच्या मोटारसायकली तयार करणे, हे या भागीदारीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

बजाज ऑटोला फायदा
ट्रायम्फ आणि बजाज यांच्या हातमिळवणीचा थोडा अधिक फायदा बजाज ऑटो कंपनीला होऊ शकतो. कारण ट्रायम्फची गुणवत्ता, किंमत आणि जागतिक वितरण प्रणाली खूप मजबूत आहे. ट्रायम्फची सर्वात स्वस्त मोटारसायकल 675 सीसी इंजिन क्षमता असणार्‍या मोटारसायकलीपासून होते. ज्या गाडीची किंमतदेखील काही लाखांमध्ये आहे. दुसरीकडे बजाज कंपनीच्या मोटारसायकलच्या इंजिनची क्षमता 100 सीसीपासून सुरू होऊन 373 सीसीपर्यंत थांबते. ट्रायम्फच्या तुलनेत बजाज कमकुवत असली तरी बजाजचे अनेक ब्रॅण्ड जगाच्या भरपूर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.

भारतातच बनणार मोटारसायकल
ऑस्ट्रियन मोटारसायकल ब्रॅण्ड केटीएम सोबत 48 टक्क्यांची भागीदारी केल्यानंतर आता ट्रायम्फशी भागीदारी करण्यासाठी बजाजने पुढाकार घेतला आहे. संयुक्त भागीदारीत 300 ते 600 सीसी इंजिन क्षमता असणार्‍या मोटारसायकली बजाज कंपनीच्या भारतातील कारखान्यांमध्येच तयार करण्यात येणार आहेत. नवीन मोटारसायकलीला बाजारात येण्यासाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.