मंचर : लांडेवाडी – मंचर परिसरात बटाटा काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. बाजारभाव चांगला मिळत नसल्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात सातगाव पठारावरील पेठ, पारगाव, कारेगाव, भावडी, कोल्हारवाडीसह पठारावरील सर्वच गावात बटाटा लागवड केली जाते. उत्पादित झालेला बटाटा पेप्सी कंपनी खरेदी करते. तालुक्याच्या पूर्व भागात मंचर, घोडेगाव, रांजणी, वळती, अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव, शिंगवे, लाखणगाव, पोंदेवाडी, जारकरवाडी इत्यादी गावांतील शेतकरी बटाट्याबरोबरच कांदा, फ्लॉवर, कोबी, भुईमुग, काकडी, बीट, हिरवी मिरची, गवार, धना, मेथी नगदी पिके घेतात. बटाटा पिकाला चालु हंगामात वातावरण पोषक असल्याने बटाट्याचे उत्पादन सुद्धा चांगले निघत असून 50 किलो बटाटा वाणाला 8 ते 9 कट्टे निघत आहेत. अनेक शेतकरी शेतातच ठोक भावात बटाटा विक्री करीत आहेत.