बडगाम: जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा दलाला एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. आज रविवारी बडगाम जिल्ह्यातील चांदुरा येथे झालेल्या चकमकीत हा दहशतवादी ठार झाला. घटनास्थळी सुरक्षा दलाकडून अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.
चांदुरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर याठिकाणी शोधमोहीम सुरू होती. त्याचदरम्यान दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमकीला सुरूवात झाली. यामध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आलं असून आसपास दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.