‘बडीकॉप’, ‘पोलीस काका’ योजना सक्षमरित्या राबवा

0

पिंपरी-चिंचवड : महिलांच्या सुरक्षतेसाठी पोलीस यंत्रणेद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘बडीकॉप’ व ‘पोलीस काका’ या सुविधा तसेच अन्य योजनाही सक्षमरित्या राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षा महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर यांनी व्यक्त केली. महापालिकेच्या वतीने शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच महिला कामगारवर्ग यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याकामी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी स्थायी समिती सभागृहात बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती
या बैठकीस स्थायी समिती सभापती सीमा सावळे, नगरसेवक सागर अंगोळकर, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, योगिता नागरगोजे, सोनाली गव्हाणे, चंदा लोखंडे, सुलक्षणा धर, निकीता कदम, रेखा दर्शिले, आशा धायगुडे-शेंडगे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, सुहास बहादरपुरे, प्राचार्य शशिकांत पाटील तसेच किशोर केदारी उपस्थित होते.

विविध मुद्द्यांवर चर्चा
बडीकॉप, पोलीस काका या योजनांची जनजागृती महापालिका व पोलीस यंत्रणेमार्फत झाली पाहिजे. त्यासाठी पोस्टर, सिटी केबल, वर्तमानपत्रे तसेच प्रसार माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात योजनांची प्रसिद्धी झाली पाहिजे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करून पोलीस अधिकार्‍यांनी महिन्यातून एकदा त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. शाळा, महाविद्यालये, कार्यालयांमध्ये होमगार्ड, एन.एस.एस., एन.सी.सी. चे स्वयंसेवक, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, पोलीस मित्र यांची संयुक्त समिती स्थापन करावी, असे मुद्दे बैठकीत सूचविण्यात आले.

पोलीस यंत्रणेने दक्ष रहावे
बैठकीत स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, पोलीस यंत्रणा सक्षम असेल तर शहरातील महिला सुरक्षित राहतील. सर्व महाविद्यालय व शाळांमध्ये तक्रार पेट्या ठेवण्यात याव्यात, जनजागृतीपर फलक लावण्यात यावेत. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेने दक्ष रहावे. शाळा, महाविद्यालयांमध्ये हुल्लडबाजांवर लक्ष ठेवण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, असेही त्या यावेळी म्हणाल्या. महिलांच्या समस्या निवारणाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिले.