बडोदा संमेलन राज्य महोत्सव घोषित करावे!

0

स्वागताध्यक्ष भारत देसरडांचे मोदींना पत्र

पुणे : मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासासाठी गेल्या 90 वर्षांपासून अधिक काळ होत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा गुजरातमधील बडोदा येथे होत आहे. यासाठी भाषा संवर्धन आणि विकासाच्या दृष्टीने सहकार्य करावे आणि हा महोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करावा, अशी मागणी 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये स्वागताध्यक्ष भारत देसरडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दोन राज्यांचे ऋणानुबंद जपावेत!
बडोदा येथे 16 ते 18 फेब्रुवारी 2018 या कालावधीत 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलन होत आहे. गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणावर मराठी बांधव आहेत. मराठी जनतेची अभिरुची जपण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी या ऐतिहासिक संमेलनाला राज्य महोत्सव म्हणून घोषित करावे, अशी मागणी भारत देसरडा यांनी केली आहे. राजमाता शुभांगीनीराजे गायकवाड यांच्या देखरेखीखाली हे संमेलन होणार आहे. गुजरात आणि महाराष्ट्राचे गेल्या अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा दोन्ही राज्यातील लोक एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. यामुळे या महोत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व असून, त्यादृष्टीने केंद्र आणि गुजरात सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही देसरडा यांनी केले आहे.