बडोद्यांचा संघ घरच्या मैदानावर महाराष्ट्राकडून पराभूत

0

बडोदा । मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने बलाढ्य बडोदा संघाला त्याच्या घरच्या मैदानावर 7 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात अंकित बावणेसोबत केलेली भागीदारी व निखिल नाईक, नौशाद शेख यांनी केलेली वादळी फलंदाजी व शेवटी झोलच्या फटक्याने विजय साजरा केला.या सामन्यात बडोदा संघाचा कर्णधार इरफान पठाण याने 4 षटकात 47 धावा दिल्या.बडोदा संघाने 168 धावांचे लक्ष महाराष्ट्र संघाला दिले.त्याच्या प्रत्युत्तरात महाराष्ट्राने 3 फलंदाज गमावून 168 धावांचे लक्ष गाठले.

महाराष्ट्राकडून सर्वाधिक चांगली खेळी
बडोदा संघाने 20 षटकांत 6 बाद 168 धावा ठोकल्या. केदार देवधर (14) आणि मोनील पटेल (6) हे सलामीवीर 5.1 षटकांत धावफलकावर 29 धावांत गमावल्यानंतर दीपक हुडा आणि युसूफ पठाण यांनी तिसर्‍या गड्यासाठी 80 धावांच्या भागीदारी केली. युसूफ पठाणने 35 चेंडूंतच 3 चौकार व 3 षटकारांसह 56 आणि दीपक हुडा याने 41 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 53 धावांची खेळी केली. महाराष्ट्राकडून निकीत धुमाळने 18 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरात विजय झोलच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने विजयी लक्ष्य 19.5 षटकांत 3 फलंदाज गमावून पूर्ण केले. त्यानंतर निखिल नाईक आणि नौशाद शेख यांनी 13 चेंडूंत नाबाद 40 धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राच्या चित्तथरारक विजयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राकडून विजय झोलने सर्वाधिक 50 चेंडूंत सणसणीत 9 चौकार आणि एका टोलेजंग षटकारासह 64 धावा केल्या. निखिल नाईकने 12 चेंडूंत 2 चौकार व एका षटकारासह नाबाद 26, अंकित बावणे याने 28 चेंडूंत 2 चौकार, एका षटकारासह 24, स्वप्निल गुगळेने 23 चेंडूंत 5 चौकारांसह 24 आणि नौशाद शेखने मोक्याच्या क्षणी अवघ्या 6 चेंडूंतच 3 षटकारांसह वादळी नाबाद 21 धावांची निर्णायक खेळी केली.