संमेलनाची शोभा वाढावी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून प्रकाशक बडोद्यात दाखल झाले होते. आयोजकांनी ठरवून दिलेल्या जागेवर प्रदर्शन उभारण्यात आले. मात्र, तीन दिवस झाले, तरी ग्रंथ प्रदर्शनाकडे वाचकांचा फेरा तसा कमीच दिसत होता. आयोजकांनी ग्रंथ प्रदर्शनाला फारसे महत्त्व दिले नसल्याचे त्यातून स्पष्ट झाले. शेवटी समारोपाच्या वेळी प्रकाशकांनी संमेलनाचा निषेध केला. संमेलन सुरू असताना ग्रंथ प्रदर्शन बंद केले, तरीही साहित्य महामंडळाने प्रकाशकांना धुडकावून लावले. अशी अवहेलना प्रकाशकांची यापूर्वी कधीच झाली नाही, संगणकाच्या युगात की-बोर्डवरील शब्दांचे महत्त्व जरी वाढले असले, तरी छापील ग्रंथ रूपातच संत वाङ्मय किंवा इतिहासकालीन बखरीमध्ये मराठीचे अस्तित्व हजारो वर्षांपासून टिकून आहे. कारण ते शाश्वत आहे. बडोद्यात प्रकाशकांचे वस्त्रहरण झाले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दरवर्षी लावण्यात येणारे ग्रंथ प्रदर्शन संमेलनाचे सौभाग्याचे लेणंच असते. त्याशिवाय संमेलनाची कल्पनाच करता येऊ शकत नाही. बडोद्याच्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात महाराज सयाजीराव गायकवाड साहित्यनगरीत भव्य मैदानात भोवताली ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. संमेलनाने पुन्हा एकदा महाराष्ट्राची सीमा ओलांडावी म्हणून पंजाबच्या घुमानमध्ये जेव्हा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा ग्रंथ प्रकाशकांना बराच फटका बसला होता. महाराष्ट्राबाहेर संमेलनाला म्हणावी तशी गर्दी होत नाही. त्यामुळे ग्रंथ प्रदर्शनात तशी विक्री होत नाही. मराठी भाषेची सेवा करायची म्हणून प्रकाशक स्वखर्चाने ग्रंथांची खोकी घेऊन येतात, प्रदर्शन सजवतात आणि संमेलनाचे तीन दिवस आपल्याच पुस्तकांना न्याहाळत बसतात. म्हणून महाराष्ट्राबाहेर संमेलन म्हटले की, प्रकाशकांच्या उरात आता धडकीच भरते, तरीही यंदांच्या वर्षी संमेलनाची शोभा वाढावी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून प्रकाशक बडोद्यात दाखल झाले होते. आयोजकांनी ठरवून दिलेल्या जागेवर प्रदर्शन उभारण्यात आले.
मात्र, तीन दिवस झाले, तरी ग्रंथ प्रदर्शनाकडे वाचकांचा फेरा तसा कमीच दिसत होता. पहिल्या दिवशी तर बर्याच प्रकाशकांचा गल्ला रिकामाच होता, दुसर्या दिवसापासून संमेलनस्थळी प्रकाशकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येऊ लागला. घडल्या प्रसंगाचे विश्लेषण होऊ लागले आणि थेट आयोजकांवर दोषारोप होऊ लागला. संमेलन ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आले, ते महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचा परिसर तसा मोठा. भव्य मैदानात मुख्य व्यासपीठ तेही खुले. त्याभोवती ग्रंथ प्रदर्शन आणि त्या व्यासपीठावर पहाटे सहा वाजताचा आणि रात्री 8 नंतरचा सांस्कृतिक कायर्र्क्रम व्हायचा आणि संध्याकाळी एकच कार्यक्रम असे दिवसभरातील फारच तुरळक कार्यक्रम या ठिकाणी नियोजित होते, बाकी सर्व चर्चासत्रे, कार्यशाळा, कविसंमेलने मैदानाच्या भोवती असलेल्या इमारतींमधील सभागृहात होत होते. सगळी गर्दी भवतालच्या इमारतींमध्ये रेंगाळत होती. त्याचा थेट परिणाम ग्रंथ विक्रीवर झाला. उद्घाटनाच्या कार्यक्रमात संध्याकाळच्या 4 वाजता साहित्य रसिकांना तप्त उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या, त्यावरून आयोजकांना अनेकांनी दूषणे दिली होती. आजवर संमेलनात मुख्य सभापीठ खुल्या मैदानात कधीच नव्हते, यंदाचा हा प्रयोग सपशेल फसला. त्याचा परिणाम थेट समारोपाच्या कार्यक्रमावर झाला. नियोजित कार्यक्रम पत्रिकेत समारोपाचा कार्यक्रम मुख्य सभामंडपात होता. मात्र, उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा अनुभव लक्षात घेता साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आणि आयोजकांनी समारोपाचा कार्यक्रम जवळच्या मेहता सभागृहात घेण्याचा निर्णय अचानक घेतला आणि ग्रंथ प्रकाशकांची सहनशीलता संपली, शेवटचा कार्यक्रम तरी प्रदर्शनस्थळी व्हावा, जाताना निदान स्टॉलचे भाडे तरी सुटावे, अशी अपेक्षा करत ग्रंथ प्रकाशकांनी या निर्णयाचा निषेध केला आणि कधी नव्हे ते घडले, भरसंमेलनात ग्रंथ प्रदर्शन बंद करण्यात आले, प्रकाशकांनी निषेध केला. हे प्रकरण तापले, तरीही समारोपाचा कार्यक्रम मेहता सभागृहातच पार पडला. समारोपाच्या कार्यक्रमात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी थेट प्रकाशनांवर दोषारोप केले.
संमेलनाला जणू ग्रंथ प्रदर्शनाची आवश्यकताच वाटत नाही, असा सूर जाणवू लागला. काळाच्या ओघात साहित्य निर्मितीची माध्यमे बदलू लागली. ई-बुक, सोशल मीडियामुळे छापील पुस्तकाकडे वाचकांचा ओढा कमी होऊ लागला आहे, पण तरीही छापील शब्दसमूहाचे ग्रंथ घरात असणे, हे भाषेचे वैभवच आहे. न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये आपण मोठे घर आणि फर्निचर यांचा अभिमान बाळगतो, पण घरात एखादे पुस्तक नाही, याची साधी लाजही बाळगत नाही, हे त्यांचे वक्तव्य याचा भावना दर्शवते आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांची मात्र नेमकी उलट भूमिका आहे. त्यामुळे नाइलाजाने संमेलनाच्या फलनिष्पत्तीचा हिशेब करायला घेतला, तेव्हा हे संमेलन केवळ मनोरंजन कार्यक्रमापुरते मर्यादित होते, असा निष्कर्ष त्यातून निघाला. मराठी साहित्य संमेलनात ग्रंथ प्रकाशकांची अवहेलना झाली. असे जर साहित्य रसिकांसमोर मराठी भाषेचे कैवारी समजणारे साहित्यिक ग्रंथ प्रकाशकांचे वस्त्रहरण करू लागले, तर कोणत्या प्रकाशकांना संमेलनाप्रति आस्था वाटेल. आधीच संमेलनाला प्रसिद्ध साहित्यिक पाठ फिरवू लागले आहेत. संमेलनात मानापमान वाढू लागले आहेत. मराठी भाषेसाठी ठोस काही कार्य घडत नाही. त्यामुळे मागील दोन दशकांहून अधिक काळ रत्नाकर मतकरी यांच्यासारख्या अनेक साहित्यिकांनी संमेलनाचे तोंड पाहिले नाही, आता ग्रंथ प्रकाशकही अशी भूमिका घेऊ लागले, तर यापुढील संमेलनात केवळ जेवणाच्या पंक्ती उठवल्या जाणार आणि संगीत मैफिली होणार, असेच दिसते. साहित्य महामंंडळाने आत्मपरीक्षण करण्याची गरज बनली आहे. प्रसिद्ध साहित्यिकांची नाराजी दूर केली पाहिजे, त्यांचा सहभाग संमेलनात वाढवला पाहिजे, संमेलनस्थळी या साहित्यिकांचा सहवास साहित्य ससिकांना लाभला पाहिजे. ग्रंथ प्रकाशकांना उचित सन्मान दिला पाहिजे. नवे संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात अनेक भूमिका मांडल्या, ते निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक योजना आहेत. म्हणूनच त्यांनी संमेलनाच्या कार्यक्रमाच्या आखणीमध्ये मराठी भाषेच्या संगणकीयकरणाकडे अधिक भर दिला. त्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या, या कार्यशाळांना तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर मराठीचा वापर करण्याबाबत जागृती करणारे परिसंवाद घेतले.
संमेलनाध्यक्षांचा हा आग्रह उचित आहे, पण म्हणून आजवर ज्यांनी पदरमोड करून मराठी भाषेतील विविध ग्रंथ प्रकाशित करून भाषेचे वैभव टिकवून ठेवले, जोवर शब्द पुस्तक रूपात आहेत, तोवर ते चिरकाल आहेत. संत वाङ्मय असो किंवा इतिहासकाळातील बखर असो हे ग्रंथ रूपात आहेत, म्हणून हजारो वर्षांनंतरही त्यांचे अस्तित्व आजही दिसत आहे. आज ज्यांकडे मराठी भाषेचे दायित्व आहे, त्या साहित्यिकांनी काळाच्या ओघात वाहून जाऊ असा आततायीपणा करणे चुकीचे आहे. संमेलनाध्यक्ष यातून काही तरी सुवर्णमध्य काढतील, अशी अपेक्षा आहे. ग्रंथदिंडीला मोठा प्रतिसाद मिळाला, असे कौतुक करत स्वत:चीच पाठ थोपटवणारे आयोजक प्रत्यक्ष संमेलनात किती स्थानिक मराठी भाषिक फिरकले याचा ऊहापोह करत नव्हते. महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिकांसाठी म्हणून बडोद्यात आयोजित केलेल्या संमेलनाचा उद्देश किती सफल झाला, हेही यानिमित्ताने पाहावे लागेल. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर संमेलने घेण्याच्या प्रयोगाचे समीक्षण करण्याची वेळ आता आली आहे. बेळगाववासीय जे मागील दोन वर्षांपासून हात जोडून विनंती करतायेत की, एकदा तरी बेळगावात अखिल भारतीय मराठी संमेलन घ्या, ती विनंती पुढच्या वर्षीसाठी मान्य करावी, त्यांच्याकडून आमंत्रणही आले आहे, त्यामुळे जेथे मराठी भाषेचा सन्मान वाढवण्याची गरज आहे तिथे साहित्य महामंडळाने शक्ती खर्च करावी, असेही सांगावेसे वाटत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा दर्जा हा भव्य – दिव्यतेपेक्षा समृद्ध असायला हवा. तिथे विविधता हवी. पंढरीच्या वारीत ज्याप्रमाणे अनेक संतांच्या दिंड्या येऊन मुख्य वारीत एकरूप होतात. त्याप्रमाणे ठिकठिकाणी होणारी छोटी छोटी संमेलने त्या मुख्य प्रवाहात सामील होतील असे वातावरण निर्माण व्हावे. केवळ अन्य राज्यांमध्ये संमेलन घेऊन ते संमेलन अखिल भारतीय होत नाही, तर ज्यावेळी साहित्य प्रचार आणि प्रसारासाठी जे जे कुणी पुढे येतात, प्रयत्न करतात अशांना हे व्यासपीठ मिळाले, तर ते खर्या अर्थाने अखिल भारतीय म्हणता येईल.
– नित्यानंद भिसे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8424838659