सांगली । महाराष्ट्रात जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा बत्तीस शिराळा गावात गेल्या 1000 वर्षापासून सुरू होती. यासाठी हे गावा संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द होते.मात्र गेल्या काही वर्षापासून न्यायालयाच्या आदेशानुसार खर्या नागांची होत असलेली पारंपारिक पूजा बंद झाली आहे. जुन्या पारंपारिक पुजेसाठी परवानगी देण्यात यावी असा आग्रह धरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौर्यावर असताना गावकर्यांनी गाव बंद करून वेगळ्या पध्दतीने आंदोलन केले.31 रोजी मुख्यमंत्री शिराळा गावाच्या दौर्यावर असतांना स्वागताऐवजी गावकर्यांनी आंदोलन केले. त्यामुळे पूर्ण गाव बंद असल्याचे मुख्यमंत्र्यांची दृष्टीस आले.
शिराळ्यात नागपंचमीवेळी जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा हजार वर्षांची परंपरा होती,मात्र गेल्या चौदा वर्षांपासून न्यायालयाच्या आदेशान्वये बंद आहे. ही प्रथा पुन्हा सुरू व्हावी यासाठी 31 रोजी मुख्यमंत्री गावाच्या दौर्यावर असतांना ग्रामस्थांनी गावबंदीच्या निर्णयामुळे गावकरी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले. गावबंद असल्यामुळे सर्व दुकाने बंद होती. भाजप कार्यकर्त्यांनी गावकर्यांना दुकाने उघडण्यास सांगितले. त्यांनी नकार दिल्यानंतर दोन गट आमने सामने आले. त्यांच्यामध्ये झालेल्या वादावादीचे रुपांतर भांडणात झाले. गावकर्यांपैकी 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शिराळ्यातील नागपंचमी हे गावाचे वैभव होती. आता तीच बंद झाल्यामुळे गावाची शान गेली आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत हे गतवैभव प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण विविध मार्गांनी आंदोलन करू असे गावकर्यांचे म्हणणे आहे.
मात्र प्रशासनाकडून नागांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्याचा आग्रह धरण्यात येत असून कायद्यान्वये जिवंत नागांची हाताळणी, अथवा मिरवणूक काढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याआधी गावकर्यांनी परवानगीसाठी निवडणुकांवरदेखील बहिष्कार टाकला आहे.जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी मिळेपर्यंत सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. नागपूजा पुन्हा सुरू व्हावी यासाठी बंद, मोर्चा, उपोषण आदी आंदोलनात सामान्य शिराळकरांचीच कोंडी होत असल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही प्रथा पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करण्याकरिता सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असणारी समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे.