अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध जोडून सातत्याने माझी बदनामी करणार्यांना मी न्यायालयात खेचणार आहे. माझे वय 80 वर्षे असले तरी नवी लढाई लढण्यासाठी तयार आहे. याबाबत वकिलांशी चर्चा सुरू असून, बदनामी करणार्या लोकांविरुद्ध खटला भरणार आहे, अशी माहिती थोर गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. हजारे यांनी नवी दिल्लीत रामलीला मैदानावर नुकतेच लोकपाल आणि शेतकर्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केले होते. या आंदोलनाचा संघाशी काहीही संबंध नाही. हा संबंध जोडून आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत, असे अण्णा म्हणाले. माजी मंत्री नबाब मलिक यांनी एका मराठी वृत्तवाहिनीवर बोलताना अण्णांनी संघाच्या शाखेत दहा वर्षे प्रशिक्षण घेऊन सामाजिक काम सुरु केले, असा आरोप केला होता. त्यावर विशिष्टवर्गाकडून माझे नाव संघाशी जोडण्याचा प्रयत्न करून जाणिवपूर्वक बदनामी करण्यात येत आहे, असा खुलासाही अण्णांनी केला आहे.
कल्पना इनामदार यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व नव्हते!
अण्णा हजारे यांनी दिल्लीत नुकतेच केलेले उपोषण फसल्याची चर्चा आहे. या उपोषणाच्या अनुषंगाने प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बातम्या येत आहेत. नथुराम गोडसे यांची नात असलेल्या कल्पना इनामदार यांच्या हाती अण्णांच्या आंदोलनाची सूत्रे होती, अशीही एक चर्चा सध्या सुरू आहे. उपोषण संपवून राळेगणसिद्धीत परतलेल्या अण्णांनी गुरुवारी प्रथमच सार्या आरोपांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले. तसेच, आंदोलनातील कार्यकर्त्या कल्पना इनामदार या नथुराम गोडसेच्या नात असून, त्यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्त्व होते. असे वृत्त काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले होते. हे धादांत खोटे वृत्त असल्याचेही त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे. इनामदार यांच्याकडे कोणतेही सूत्र सोपविलेली नव्हती. समन्वय समितीमधील प्रत्येक कार्यकर्त्याने आंदोलनाची जी कामे विभागून घेतली, त्यानुसार कल्पना इनामदार यांनी मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी घेतली होती. या आंदोलनाची सर्व सूत्रे मी स्वत: हाताळीत होतो. मात्र आंदोलन बदनाम करण्याच्या हेतूने केलेल्या कटकारस्थानामुळे कल्पना इनामदार यांना नथुराम गोडसेंशी जोडले गेले. तसेच इनामदार यांना आंदोलनाचे मुख्य सूत्रधार करून माझा संघाशी संबंध जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. किती खोटे बोलावे याचेसुद्धा बदनामी करणार्या चौकडीला भानच राहिलेले नाही, असे अण्णांनी स्पष्ट केले.
लक्षात ठेवा, मी सहामंत्री, शेकडो अधिकारी घरी पाठवलेत!
प्रत्येक आंदोलन हे कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा बाजूने असल्यासारखे वाटते. बदनामीमुळे माझे काहीच नुकसान नाही. परंतु समाजाचे मोठे नुकसान आहे. सातत्याने होणारी बदनामी किंवा अपमान पचविल्यामुळे देशाचे नुकसान होत असेल तर असा अपमान पचविणे अयोग्य आहे, असे मी समजतो, असे नमूद करत, आतापर्यंत मी सहा मंत्री आणि शेकडो भ्रष्ट अधिकार्यांना घरी पाठवले आहे, याची आठवणही अण्णांनी टीकाकारांना करून दिली आहे.