बदनाम करण्याची धमकी दिल्याने युवतीने स्वत:ला पेटविले

0

धुळे : शहरातील मोगलाई समता नगर भागात राहणार्‍या एका अल्पवयीन युवतीने काल रात्री स्वत:स जाळून घेतले. तिला बदनाम करण्याची धमकी वारंवार दिली जात असल्याने मनस्ताप होवून तिने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. जळीत युवतीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सूरू असून तिची प्रकृती गंभीर आहे तर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेत संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

मोगलाईतील समता नगरता राहणारी 17 वर्षीय युवती एकवीरा देवी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत बदनामीची धमकी दिल्याने युवतीने स्वत:ला पेटविले आहे. परिक्षा सुरू असल्याने काल सोनल घरीच अभ्यास करीत असता तिला एक फोन आला आणि घरी ये असा निरोप मिळाला. परिसरातच ते घर असल्याने सोनल तेथे गेली त्यावेळी तिला बदनाम करण्याची धमकी देण्यात आली. सोनलच्या मोठ्या बहिणीचे लग्न ठरले असून या लग्नात आम्ही विघ्न आणू असे म्हणत तिच्यावर मानसिक दडपण टाकले गेले. परिणामी सोनलने घरी परत येताच कुणालाही काही न सांगता स्वत:स ज़ाळून घेतले. यात सोनल 85 टक्के भाजली असून तिला उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात दाखल होताच शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आल्याने पोलिसांनी रूग्णालयात जावून सोनलचा जबाब घेतला असता ही बाब उघड झाली. त्यानुसार पोलिसांनी सोनलला बदनामीचा धाक दाखविणार्‍यांविरूध्द रितसर गुन्हा दाखल करण्यासाठी तपास सुरू केला होता.