बदलत्या वातावरणामुळे पावसाची चाहूल लागल्याने बळीराजा सुखावला

0

नवापूर (प्रेमेंद्र पाटील)। शहरात व परिसरात नागरिक 46 डिग्री सेल्सिअस तापमानाचे चटके सोसत असताना मंगळवारी सकाळी थंडगार हवा येत पावसाचा हलका शिडकावा आल्याने मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळाले आहेत. यानंतर दिवसभर उन-सावलीचा खेळ झाल्याने कधी तीव्र उष्णतेने लोक घामाघूम झाले तर तरी हलकासा थंड हवा देऊन जात होता. या वातावरणामुळे पावसाची चाहूल लागली असून बळीराजाचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. यंदा पाऊस चांगला होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले असुन शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मागील वर्षी तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती.

शहर पाण्याचा बाबतीत भाग्यवान
नवापूर शहर पाण्याचा बाबतीत भाग्यवान आहे. दिवसातून दोन वेळा नवापूरकरांना पाणी मिळत असते. यंदाही पाऊस लवकर आणि भरपूर बरसावा अशी प्रार्थना शेतकरीराजा करत आहे. दुसरीकडे वृक्षलागवड करण्यासाठी सामाजिक व सेवा भावी संस्था सज्ज झाल्या असून वनविभागामार्फत शहरातील नागरिकांना त्यांच्या पसंतीचे विविध रोपे उपलब्ध करून दिली आहेत. शहर व परिसरात ऊन, सावली व थंड हवा याचा ञिवेणी संगम सध्या सुरू आहे. पावसाचे वातावरण तयार होऊन मान्सूनपूर्व वारे वाहू लागले असल्याने 7 जुन नंतर पाऊस बरसतो की त्यापूर्वीच, हे या दोन तीन दिवसात दिसणार आहे.

शेतीच्या कामांना आला वेग
शेतकर्‍यांच्या मान्सुनपूर्ण कामांना वेग आला असून ग्रामीण भागातील आदिवासी बांधव आपले घरावरील कौल, पतरे बदलून घेण्याचा तयारीत मग्न झाले आहेत. मान्सून सक्रिय होत असुन शेतकरी आता शेती कामात मग्न झाला असून पेरणीची तयारी करताना दिसत आहे. बी-बियाणे, खते व औषधीसाठा उपलब्ध करून बळीराजा सज्ज झाला आहे. एक मोठा पाऊस झाला तर एकूणच कामाला वेग येणार असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत. नवापूर शहर व तालुक्यात 7 जुन नंतर पावसाळा सुरू होण्याच्या इतिहास आहे. लग्नाचा हंगाम जोरात सुरू असून जोरदार पाउस येण्याचा इशारा वातावरण देत आहे.

प्रशासनाकडून तयारी
प्रशासनानेसुध्दा आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक घेऊन नियोजन करून सुचना दिल्या आहेत. अद्याप नगरपालिकेने नालेसफाई केली नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवापूर तालुका पञकार संघ व नागरिक यांनी लोकसहभागातुन रंगावली धरणातून गाळ काढण्याने भरपूर पाणीसाठा अद्यापही उपलब्ध असल्याने नवापूर शहर व तालुक्याला पाणी टंचाई यंदा जाणवलीच नसल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. माञ शहरातील रंगावली नदी कोरडी ठणठणीत पडली असल्याचे चित्र आहे. बारमाही पाणी पुरवठा करणारी रंगावली नदी गेल्या काही वर्षांपासून कोरडी पडत आहे. हे भविष्यातील भीषण पाणी टंचाईचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.