बदलत्या वातावरणामुळे शहरात संसर्गजन्य आजार वाढले

0

पुणे । अधूनमधून पडणारा पाऊस आणि कडक उन्हामुळे शहरात संसर्गजन्य आजार वाढले आहेत. बदललेल्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, श्‍वसनाचे विकार यांसारख्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरात ढगाळ व दमट वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण आजार पसरविणार्‍या विषाणुंसाठी पोषक ठरत असल्याने साथीचे आजार वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

उकळलेले पाणी प्या
दुपारी पडलेल्या कडक उन्हामुळे नागरीक तहान भागविण्यासाठी लिंबू पाणी, उघड्यावरील फळे, थंड शितपेय व थंड पाण्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात. त्यामुळे घशाचे विकार घेऊन नागरीक रुग्णालयांमध्ये गर्दी करत आहेत. लहान मुलांमध्ये देखिल या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, कफचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांना थंड शितपेय व आईस्क्रीम देणे टाळावे. दररोज उकळलेले पाणी पिण्याचा देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच हवेत धुळीचे कण मिसळल्यामुळे श्‍वसनाचे आजार वाढले आहेत. दमट वातावरणामुळे ज्येष्ठ नागरीकांमध्ये बीपी कमी होऊ सातत्याने घाम येणे, दम लागणे, अशक्तपणासारखे विकार उद्भवत आहेत. त्यामुळे काम असेल तरच उन्हामध्ये घराबाहेर पडण्याचा सल्ला डॉक्टर देताना दिसत आहेत.

लहानग्यांना दम्याची शक्यता
सकाळी कडक ऊन, अधून मधून पडणारा पाऊस व रात्री थंड वातावरण असल्याने वायरलच्या रुग्णांत वाढ झाली आहे. मोठ्या व लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, घसा, ताप, उलट्या-जुलाब, डोकेदुखीसारखे आजार उद्भवत आहेत. या वातावरणामुळे होणार्‍या सर्दीत एका बाजूचे नाक चोंधते, तसेल लहान मुलांना बाळदमादेखिल होऊ शकतो. अशा वातावरणात थंड पाणी किंवा शितपेय पिऊ नये तसेच बाहेरील व उघड्यावरच्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळावे. लहान मुलांना सकाळी शाळेत जाताना थंड वारे लागू नये म्हणून स्कार्फ बांधावा व ज्येष्ठ नागरीकांनी बाहेर जाताना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी छत्रीचा वापर करावा.
– डॉ. सचीन राशीनकर