आम आदमी पार्टी ही नेहमी महात्मा गांधी यांचा हवाला देत असते. नव्याने या पक्षाचा आरंभ झाला तेव्हापासून त्यांनी कायम गांधींना आपल्या तिजोरीत बंद करून ठेवलेले आहे. एकदा कुठल्या तरी कार्यक्रमात त्या पक्षाचे म्होरके अरविंद केजरीवाल यांना कोणी तरी सणसणीत चपराक हाणली होती. इतकी जबरदस्त थप्पड होती, की केजरीवाल यांचे तोंड सुजलेले होते. तेव्हा त्यांच्यासह अनेक सहकार्यांनी राजघाटावर धाव घेतली होती. तिथे काही वेळ शांत ध्यानधारणा करून ही मंडळी उठली होती. आपण हिंसाचाराचा विरोध करतो म्हणूनच आमच्यावर कोणी हल्ला केला, तरी त्याला चोपून काढण्यापेक्षा आम्हीच आत्मक्लेश करतो, असे झकास नाटकही मंडळी सातत्याने रंगवत आलेली आहेत. पुढे वारंवार असे प्रसंग घडत आले. देशात शेकडो लहानमोठे पक्ष आहेत. पण अल्पावधीतच केजरीवाल यांच्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते यांच्यावरच दगड फेकणे वा त्यांच्या तोंडाला काळे फासणे, अशा घटना सुरू झाल्या. त्यांनी निवडणुका जिंकण्यापर्यंत अशा घटनांचा पूर आला होता आणि सत्ता त्यांच्या हाती आल्यावर अशा घटना अकस्मात थांबल्या होत्या.
पुढे केजरीवाल यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीत उडी घेतली आणि पुन्हा तशा घटनांचा क्रम सुरू झाला. अशा प्रत्येकवेळी त्यांनी राजघाटावर जाऊन गांधींना साक्षीदार बनवले होते. अशा केजरीवालना पुन्हा झालेल्या निवडणुकीत मोठे यश मिळाले आणि त्यांनी गांधींना किळस असलेल्या प्रत्येक गोष्टीचा असा अवलंब केला, की आता राजघाटावर असा माणूस बघितला तर खुद्द महात्माच दिल्लीला रामराम ठोकून पळ काढील. दंडविधानात जितके म्हणून गुन्हे सांगितलेले आहेत, त्यापैकी कुठलाही गुन्हा करण्याची संधी या पक्षाच्या नेत्यांनी वा कार्यकर्त्यांनी सोडलेली नाही. आता तर त्यांनी तोच धुडगूस विधानसभेतही घालून दाखवला आहे. मे महिन्याच्या आरंभी त्यांच्याच पक्षाचा एक नेता व निलंबित केलेला मंत्री कपिल मिश्रा, याने केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतरही सातत्याने नवे आरोप केलेले आहेत. आता त्यापैकी अनेक बाबतीत गुन्हेही दाखल झाले असून, धाडी पडल्या आहेत. तपासही सुरू झाला आहे. पण त्यापैकी एकाही आरोपाला उत्तर देण्याची हिंमत या आधुनिक गांधीने दिलेली नाही. उलट सर्व आरोप खोटे असल्याचे सांगून पळ काढलेला आहे. लोकांसमोर येण्याचे टाळलेले आहे. अवघ्या दोन वर्षांत यांच्या मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांना गंभीर गुन्ह्यासाठी अधिकारपद सोडावे लागले किंवा हाकलून द्यावे लागलेले आहे. यातला एकच मंत्री असा आहे, की ज्याच्यावर कुठला गंभीर आरोप झाला नाही किंवा आरोपासाठी त्याला हाकलून लावावे लागलेले नाही. नेमक्या त्या मंत्र्याचे नाव कपिल मिश्रा असावे हा योगायोग! दुसरा योगायोग असा, की त्यानेच आता केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केलेले असून, त्यापैकी काहींचा तपास सुरू झालेला आहे.
अशा सहकार्याला केजरीवाल हाकलून लावतात. पण ज्याच्याविरोधात आरोप झाले, गुन्हे दाखल झाले किंवा धाडी पडल्या, अशा सत्येंद्र जैन नावाच्या मंत्र्याची मात्र केजरीवाल पाठराखण करत बसलेले आहेत. त्यापैकीच काही आरोप करायला कपिल मिश्रा विधानसभेत उभा राहिला, तेव्हा केजरीवाल नावाच्या गांधीने विधानसभेतच आपल्या सहकार्यांना कपिलच्या अंगावर सोडले आणि मस्त मारहाण करून मुस्कटदाबीचा प्रयास केला. अर्थात त्याचेही चित्रण थेट प्रक्षेपित होत असल्याने जगाला सत्य बघता आले. पण त्याचा सुगावा लागताच केजरीवाल यांनी प्रक्षेपण थांबवले. त्यांनी म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या सभापतींनी प्रक्षेपण थांबवले, असा आजचा गांधीवाद झालेला आहे. ज्याच्याकडे बघितल्यावर हिटलरलाही थक्क व्हायची पाळी यावी, अशी एकूण स्थिती आहे. अर्थात यात नवे काहीच नाही. लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला तेव्हा केजरीवाल गुजरातच्या दौर्यावर होते आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्यांचा गाड्यांचा ताफा गुजरातच्या कुठल्या रस्त्यावर रोखण्यात आला. तेव्हा तिथले मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनीच तसे आदेश दिल्याचा कांगावा करीत केजरीवाल यांनी तमाशा सुरू केला होता. त्याची खबर लागताच दिल्लीतील त्यांचे अनुयायी व आम आदमी पक्षाचे लोक, भाजपच्या मुख्यालयावर चाल करून गेले होते. त्यांनी तिथे जबरदस्त दगडफेक सुरू केली होती आणि त्यात पक्षाचा एक नेता आशुतोष आघाडीवर होता. काही दिवसांपूर्वी एका वाहिनीचा संपादक म्हणून काम करणारा आशुतोष सराईत गुंड वा दंगेखोराप्रमाणे त्या दगडफेकीत भाग घेत होता. नंतर तो दंगा शांत झाल्यावर त्यानेही आपण संतप्त कार्यकर्त्यांना रोखत असल्याचे नाटक केलेले होतेच. हे या पक्षाचे खरे चारित्र्य आहे. तीच त्यांची खरी ओळख आहे. गांधींचे कातडे पांघरूण एक गुन्हेगारांची टोळी दिल्लीवर सध्या राज्य करते आहे. आमदार किंवा नेते म्हणून त्यात जे लोक मिरवत असतात, त्यांचा खरा चेहरा कपिल मिश्राने समोर आणलेलाच आहे. एकाहून एक नामचिन गुन्हेगार केजरीवालनी कुठून व कसे शोधून आपल्या पक्षात जमा केले, त्याचेही कौतुक वाटते. कुठलाही आरोप वा गुन्हा असेल तर आपल्या पक्षाची उमेदवारी मिळू शकत नाही, इथून या पक्षाची सुरुवात झालेली होती. आज त्याच बहुतांश गुन्हेगार व अट्टल बदमाश कुठून जमा झाले, त्याचा अंदाजही येत नाही. एकेकावरचे आरोप व त्यातले गुन्हे बघितले, तरी अंगावर काटा येतो. महिलांचे लैंगिक शोषण, बिल्डरकडून खंडणी उकळणे, दुकानदार व्यावसायिकांची लूट अशा अनेक गुन्ह्यांत गुंतलेले महाभाग शोधून त्यांनाच निवडून आणण्याचे कौशल्य, यापूर्वी कुठल्या पक्षाला वा नेत्यालाही दाखवता आलेले नाही.
कपिल मिश्रा या बंडखोर आमदाराने आरोप केलेत म्हटल्यावर तो विधानसभेतही आरोप करणार हे उघड होते. त्याचे आरोप ऐकण्याचाही संयम वा धैर्य केजरीवाल नामे गांधी अनुयायाला साध्य झाले नाही. विधानसभेत क्रूर बहुमत पाठीशी असतानाही त्यांना दोनचार विरोधकांचा आवाज सहन करता येत नाही. त्यांना आजकाल गांधीवादी संबोधले जाते. मग ज्यांची संभावना नथुरामवादी अशी केली जाते, त्यांनी काय करावे? त्याचेही उदाहरण समोर आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत भाजपला तिथे मोठे बहुमत मिळाले आहे. त्यांच्यापुढे विरोधी पक्ष नेस्तनाबूत झाला आहे. इतके मोठे बहुमत पाठीशी असलेला योगी आदित्यनाथ नावाचा मुख्यमंत्री विधानसभेत विरोधक धुमाकूळ घालताना शांत बसला होता.
राज्यपालावरही समाजवादी व काँग्रेसचे सदस्य कागदाचे बोळे फेकत होते. त्यात हस्तक्षेप करायला कोणी भाजपचा आमदार पुढे सरसावला नाही किंवा त्याने विरोधी आमदाराशी दोन हात केले नाहीत. कुठलीही मारहाण झाली नाही. भाजपवर नथुरामवादी असल्याचा आरोप होतो. थोडक्यात गुंडगिरी वा खुनी असा आरोप अंगावर घेणारे गांधींच्या नीतीनुसार विधानसभेत शांत बसले होते आणि गांधींच्या नावाची जपमाळ ओढणारे धुडगूस घालत होते. याला विरोधाभास म्हणायचा, की बदललेल्या व्याख्या म्हणायच्या? आजकाल गुंडगिरी म्हणजे गांधीवाद झाला आहे. हिंसाचार म्हणजे गांधीवाद झाला आहे, तर सहनशीलता, संयम व सोशिकता म्हणजे नथुरामवाद झाला आहे अन्यथा ही माणसे अशी कशाला वागली असती? भ्रष्टाचाराला साधनशुचिता व सभ्य वर्तनाला अनाचार समजावे, अशी स्थिती आलेली आहे. त्यामुळेच असेल नामधारी गांधीवाद्यांना बाहेरचा रस्ता दाखवून गांधीनीतीप्रमाणे वागणार्यांना सामान्य मतदार सत्तेवर बसवू लागला आहे. बेशरमपणा अति झाला मग लोक जोड्याने मारू लागतात, याचाही अनुभव केजरीवालांना लवकरच येईल.